पाकिस्तान पुन्हा ‘फाळणी’च्या उंबरठ्यावर; बलूचिस्तान पाठोपाठ सिंधमध्येही ‘खदखद’

इस्लामाबाद – ब्रिटिशांचा सूर्य मावळल्यानंतर फाळणी झाली आणि पाकिस्तान वेगळा झाला. अर्ध शतकापेक्षा जास्त झालेल्या काळात भारतात लोकशाही बऱ्यापैकी रूजली. मात्र पाकिस्तानात ती रूजलीच नाही. लोकनियुक्त सरकारांना बरखास्त करून लष्कराने सूत्रे आपल्या हाती घेण्याचा प्रकार होत राहीला. त्यातही प्रांतांमध्येही खदखद होत राहीली आणि त्यातून पूर्व पाकिस्तान बाहेर पडत बांगलादेशची निर्मिती झाली.
मात्र येथेच ही खदखद थांबलेली नाही. त्याचे कारण म्हणजे बलूच नागरिक प्रचंड पेटलेले असताना आणि वेगळ्या राष्ट्राची मागणी करत असताना आता सिंध प्रांतातही त्याचे लोण पसरले आहे. त्यांनाही पाकिस्तानपासून वेगळे व्हायचे असल्यामुळे त्यांची निदर्शने सुरू झाली आहेत.
पाकिस्तानी जनतेमध्ये सध्या एवढा असंतोष आणि अस्वस्थता आहे की लवकरच पाकिस्तानचे तुकडे होणार की काय, अशी स्थिती आहे. सिंध प्रांतात निघालेले मोर्चे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना इशारे देणारे आहेत. हे मोर्चे आणि घोषणाबाजी, गल्ल्या, मोहल्ले, बाजारातून असे शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. सिंधमधल्या सानमध्ये गेल्या महिनाभरापासून प्रचंड असंतोष आहे. इथल्या लोकांना वेगळे राष्ट्र हवे आहे.
या प्रांतात कित्येक वर्षांपासून कट्टरपंथीयांची दहशत आहे. या प्रांतावर कायम लष्करी वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे सिंध प्रांताची प्रगतीच झाली नाही. सिंधमधले हे मोर्चे इम्रान खान यांना आव्हान देत आहेत.
त्याचवेळी इथली जनता नरेंद्र मोदी यांच्यासह जगातल्या शक्तिशाली नेत्यांनी सिंधमध्ये लक्ष घालावं, अशी मागणी सातत्याने करते आहे. पाकिस्तानातून जसा बांग्लादेश वेगळा झाला, तसाच सिंधही वेगळा व्हावा, अशी या लोकांची मागणी आहे. सिंधमधला उद्रेक पाहिला तर पाकिस्तान पुन्हा एकदा फाळणीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.
आम्हाला स्वतंत्र करा; अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशारा सिंधवासियांनी सरकारला दिला आहे. सिंध प्रांतात पंजाबी, ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लीम अशी संमिश्र लोकसंख्या आहे. अनेकांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात येत असल्याने खदखद शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान खान सरकारने लष्कराचा वापर करून दडपशाहीचा मार्ग अवलंबला होता. मात्र जनता माघार घ्यायला तयार नाही.
नैसर्गिक सौंदर्य, उत्तम पिके, नैसर्गिक औषधे, सुका मेवा याची सिंधला देणगी आहे. त्यामुळे सधन असलेला सिंध प्रांत पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सगळ्यांना इम्रान खान यांचे नेतृत्व मान्य नाही. उलट पाकिस्तानातल्या या प्रांतांचा भारतावर जास्त विश्वास आहे. सिंध, बलुचिस्तानमधला हा असंतोष पाकिस्तानचे लवकरच तीन तुकडे करणार, अशी शक्यता आहे.





