OBC Bahujan Aghadi : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष म्हणून यश मिळवल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांकडे लागले आहे. या निवडणुकांसाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली असतानाच, आता ‘ओबीसी बहुजन आघाडी’ या नव्या पक्षाने रणांगणात उतरण्याची घोषणा केली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत नवी समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. १२ जिल्हा परिषदांवर लक्ष – ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या नव्या राजकीय इनिंगची घोषणा केली. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका ओबीसी बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेंडगे यांच्या या निर्णयामुळे प्रस्थापित पक्षांसमोर नवीन आव्हान उभे ठाकले आहे. कार्यकर्त्यांना मिळणार ‘एबी फॉर्म’ची घरपोच सेवा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ओबीसी बहुजन आघाडी कार्यकर्त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणार असल्याचा दावा शेंडगे यांनी केला. ते म्हणाले की, “अनेकदा सक्षम कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागतो. कार्यकर्त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे. ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, त्यांनी तात्काळ संपर्क साधावा. इच्छुक उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था आमचा पक्ष करेल.” दरम्यान, सध्या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती भक्कम स्थितीत असताना, दुसरीकडे विरोधकांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेत भाजपने मिळवलेल्या यशानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रूपाने ‘मिनी मंत्रालया’वर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी मुलाखतींचा धडाका लावला आहे. अशातच ओबीसी कार्डावर निवडणूक लढवणाऱ्या या नवीन आघाडीमुळे ग्रामीण भागातील मतदानावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.