कंपनीचे नुकसान करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्यास बेड्या; ‘त्या’ पत्रकारासह चौघे फरार

महाळुंगे इंगळे – कंपनीचे नुकसान करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या चौघा जणांना महाळुंगे इंगळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका पत्रकाराचाही समावेश आहे.
प्रवीण रुपराव ठाकरे (वय 38, रा. निघोजे) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याचे साथीदार पत्रकार कांबळे, सूरज पोतदार, गणेश (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) व आणखी एकजण अशी या खंडणीबहाद्दरांची नावे आहेत.

याबाबत महाळुंगे पालिसांनी दिलेली माहिती अशी की, निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीतील रामा इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत करणारे रामकृष्ण माधव रेड्डी यांनी त्यांच्या कंपनीत काम करणारे प्रवीण रुपराव ठाकरे यांना घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये हात उसने दिले होते. त्याला तारण म्हणून एक धनादेश घेतला होता.

ठरलेल्या वेळेत पैसे परत देऊ न शकलेल्या ठाकरे याने टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. म्हणून रेड्डी यांनी ठाकरे यांनी दिलेल्या धनादेश बॅंकेत भरला. तो बाउन्स झाला म्हणून रेड्डी यांनी ठाकरे याच्या विरोधात कोर्टात धाव घेतली. या गोष्टीचा राग मनात धरून ठाकरे याने त्याचा एक मित्र पत्रकार कांबळे, राजे प्रतिष्ठानचे सूरज पोतदार या सर्वांनी मिळून रेड्डी यांच्या कंपनीत घुसून अनधिकृतपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कंपनीच्या प्लॅंट हेड प्रिया भोसले यांना शिवीगाळ केली.

तसेच कंपनी सुरू ठेवायची असल्यास ठाकरेला दिलेले तीन लाख रुपये मागू नये, तसेच त्यांना आणखीन पाच लाख रुपये द्या नाहीतर कंपनीत माथाडीचे लोक आणून कामकाज बंद पाडू अशी धमकी पत्रकार कांबळे यांच्या वतीने कॉन्ट्रॅक्‍टर चौहान यांनी फोनवरून रेड्डी यांना दिली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच महाळुंगे इंगळे पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, दत्तात्रेय गुळीग, पोलीस हवालदार अमोल बोराटे, पवन वाजे, विठ्ठल वडेकर, चंदू गवारी, शरद खैरे, श्रीधर इचके, संतोष काळे, हिरामण सांगळे, अमोल वेताळ, शिवाजी लोखंडे हे करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.