नेवासा शहरात पोलीस उपाधीक्षक संतोष खाडेंचा दरारा; भाईगिरी, गुंडगिरीला चाप, अवैध धंदे ठप्प

नेवासा : नेवासा शहर आणि परिसरात भाईगिरी, गुंडगिरी आणि अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे धडाकेबाज पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या कर्तव्यदक्ष आणि निर्भीड कारभारामुळे शहरातील दादागिरी संपुष्टात येत असून, अवैध धंदे करणारे सुतासारखे सरळ होत आहेत. अगदी पान टपरीवरही मावा-गोवा विक्री बंद झाली असून, खाडे यांच्या नावाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. यामुळे अनेकजण निर्व्यसनी बनत असल्याचे चित्र दिसत आहे.
पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी नेवासा पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी सिनेस्टाईल कामगिरी करत सज्जनांना साथ आणि गुंडांना लाथ मारण्याचे धोरण अवलंबले आहे. यापूर्वी तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना “हे आमच्या अधिकारात नाही, न्यायालयात जा किंवा तहसील कार्यालयात तक्रार करा” असे सांगून वेळ मारली जात होती. मात्र, खाडे यांनी तक्रारींचा झटपट निपटारा करत समस्यांचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे नेवासा शहरात “खाडे नावाचे वादळ” अशी चर्चा रंगली आहे.
अतिक्रमण प्रकरणात तत्पर कारवाई –
नुकतेच नेवासा शहरातील एका अतिक्रमण प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधले. एका दुकानदाराच्या दुकानाचा ताबा दुसऱ्या व्यक्तीने घेतला होता आणि त्या दुकानदाराला स्वतःच्या दुकानासमोरही उभे राहू दिले जात नव्हते. अन्यायग्रस्त दुकानदाराने शेवटी नेवासा पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस उपाधीक्षक खाडे यांची भेट घेऊन सत्य परिस्थिती सांगितली. खाडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली आणि सत्यता समजल्यानंतर ताबा घेणाऱ्या व्यक्तीला दुकान पुन्हा मूळ मालकाला उघडून देण्यास भाग पाडले. या तत्पर आणि खमक्या कारवाईमुळे जनतेतून खाडे यांचे कौतुक होत आहे.
अवैध धंद्यांना चाप, गुन्हेगार सरळ मार्गावर –
खाडे यांच्या कठोर कारवाईमुळे अवैध धंदे चालवणारेही घाबरले असून, अनेकांनी आपले धंदे बंद केले आहेत. चोरून-लपून धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात खाडे यशस्वी ठरले आहेत. परिणामी, अनेकांनी “दोन नंबर”च्या मार्गावरून “एक नंबर”च्या वाटेवर येण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नेवासा शहर आणि परिसरात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण झाली आहे.
जनतेतून कौतुकाचा वर्षाव –
पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नावाने शहरात एक वेगळाच दरारा निर्माण झाला असून, नागरिकांना आता पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची भीती वाटत नाही. खाडे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा पोलीस ठाणे खऱ्या अर्थाने नागरिकांचा आधार बनले आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे नेवासा शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा नवा अध्याय लिहिला जात आहे.





