Shahajibapu Patil : 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एक कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की एक पद मिळायचे, असा गौप्यस्फोट नीलम गोऱ्हे यांनी केला. नीलम गोऱ्हे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांवर ठाकरे गटानेही सडेतोड उत्तर दिले. त्यांना 4 वेळा आमदार केले, त्यांनी 8 मर्सिडीझ दिल्या का? असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, गोऱ्हे यांच्या विधानाला शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दुजोरा दिला आहे. नीलम गोऱ्हे यांच्या विधानाला दुजोरा शहाजीबापू पाटील म्हणाले, नीलम गोऱ्हे या अनेक वर्ष शिवसेनेत राहिल्या असून त्यांना तिथली कार्यपद्धती चांगली माहीत आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपात नक्कीच तथ्य आहे. शिवसेनेत तिकीट कशी दिली जायची, हे सर्व जगाला माहीत आहे, असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केल्याचे दिसते. पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, मला तिकीट देताना काही मागायचे धाडस यांच्यात नव्हते. त्यामुळे मला कोणी याबाबत बोलले नसावे. तसेच उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे, त्यांनी शिवसेनेत यावे, असे शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत. नेमके काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे? कार्यकर्त्यांना कमी समजण्याचे कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदेंना दिले होते, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की पदे मिळायची, असा खळबळजनक आरोप देखील नीलम गोऱ्हे यांनी या मुलाखतीत बोलताना केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असा दावाही नीलम गोऱ्हे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. त्या 4 वेळा आमदार, त्यांनी 8 मर्सिडीझ दिल्या का? – राऊत एक महिला म्हणून नीलम गोऱ्हेंबद्दल आदर आहे. राजकारण त्यांनी त्यांचे चांगभलं केलेले आहे. ही सगळी गये गुजरे लोक आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे म्हणाले. संजय राऊत यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी त्यांना चार वेळा आमदार केले. आमच्याकडे महिला आघाडीचा विरोध असताना चार वेळा विधान परिषदेचे आमदार केले. त्यामुळे त्यांनी 8 मर्सिडीझ दिल्यात का? दिल्या असेल तर त्यांनी पावत्या घेऊन याव्यात, असे आव्हान संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंना दिले.