मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पॉवर प्ले उद्या (बुधवार) रंगणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या गटांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्या आहेत. त्या बैठकांमुळे दोन्ही गटांची खरी ताकद समजेल. शिंदे-फडणवीस सरकारचा नवा घटक बनलेल्या अजित पवार यांच्या गटात राष्ट्रवादीचे नेमके किती आमदार आहेत ते अद्याप गुलदस्त्यात आहे. काका आणि पुतण्याच्या पाठिशी आमदारांचे किती संख्याबळ आहे याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर, कुणाची किती पॉवर ते बैठकांमुळे समोर येऊ शकेल.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्वच खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, पक्षाचे पदाधिकारी व नेत्यांना वांद्रे येथील एमईटीला पोहोचण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनीही मंगळवारी वाय.बी.चव्हाण केंद्रात म्हणजेच राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाची बैठक घेतली. कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होत्या. बुधवारी येथे मुख्य बैठक होणार आहे. ज्यासाठी पक्षाच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आहे.
शरद पवारांनी सोमवारी अजित पवारांसह त्यांच्या 8 समर्थक आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर आता अजित पवारांनी आपल्या गटाचे स्वतंत्र कार्यालय स्थापन केले आहे. अजित पवारांनी मंगळवारी मुंबईतील मंत्रालयासमोर आपल्या पक्षाचे नवे कार्यालय असेल असे स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासमवेत शपथ घेतलेले अन्य आठ आमदार देखील होते.
नव्या कार्यालयात गदारोळ
तत्पूर्वी, अजित पवार यांच्या नवीन पक्ष कार्यालयात मंगळवारी गदारोळ झाला. पीडब्ल्यूडी विभागाने कार्यालयाच्या चाव्या त्यांच्याकडे न दिल्याने गेट ढकलून उघडण्यात आल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर अजित यांनी त्यांच्या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. आज त्यांनी नवीन कार्यालयाचे उद्घाटनही केले.
परवानगिशिवाय माझा फोटो वापरू नये
शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ज्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कोणीही माझा फोटो वापरू नये, असे शरद पवार स्पष्ट केले.
अजित पवारांकडे कोणते खाते?
अजित पवारांसह मंगळवारी नवनिर्वाचित मंत्री मंत्रालयात हजर होते. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांसह बैठकही झाली. त्यात खातेवाटपाबाबद चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवारांकडेकडे अर्थ खाते राहिले आहे. त्यांनी अनेक वर्ष हे खाते सांभाळले असल्याने अर्थ किंवा जलसंपदा खात्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यांच्याकडे अर्थ खाते देण्यास शिवसेनेच्या मंत्र्यांचा विरोध असल्याचीही चर्चा आहे. तशी मागणीच शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
कोण काय म्हणाले…
40 पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत आहेत. एव्हाना त्यापेक्षा अधिक आमदारांचा आकडा व कार्यकर्त्यांची मोठी फळी आमच्यासोबत राहणार आहे. ते सर्व आमच्या बैठकीला उपस्थित राहतील. असा आम्हाला विश्वास आहे.
– प्रफुल्ल पटेल, अजित पवार गटाचे नेते.
53 आमदारांपैकी 9 आमदारावर कारवाई केली. उर्वरित सर्व आमदार आमचे आहेत. त्यांना प्रलोभने देऊ नये, दबाव टाकू नये असे त्या उर्वरित नऊ जणांना आवाहन राहिल. त्या सर्व आमदारांना शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचे आहे आणि त्यांना ते करू द्यावे.
– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, शरद पवार गट