राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण?

पुणे – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. गंभीर आरोप केले जात आहेत. अनेक ठिकाणी मोर्चाचे आयोजन केले जातेय. आमदार सुरेश धस यांच्याकडून या प्रकरणी गंभीर आरोप केले जात आहेत. वाल्मिक कराड हाच या खूनाच्या गुन्ह्यातील मास्टरमाईंड असल्याचे धस वेळोवेळी सांगतात. खंडणीच्या आरोपाखाली कराड कोठडीत आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे. कराड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे आहेत. त्यामुळे आमदार धस धनंजय मुंडेंनाही सातत्याने लक्ष करताना दिसतात. वाल्मिक कराडचा उल्लेख आका तर धनंजय मुंडे यांचा उल्लेख आकाचा आका असा धस वेळोवेळी करताना दिसले. मात्र पुणे येथे पत्रकारांशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी बडी मुन्नीचा उल्लेख केला. त्यानंतर आता बडी मुन्नी कोण हा सर्वांनाच प्रश्न पडला आहे.
यावरून नेमकी ही बडी मुन्नी कोण असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. हा प्रश्न ऐकताच अजित पवार संतापले. हे त्यांनाच विचारा, ते जर असल्या फालतू गोष्टी बोलत असतील तर मी आता नाव घेऊन बोलणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. पुण्यातील विकासकामांचा आढावा त्यांनी आज घेतला. त्याविषयी देखील त्यांनी माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांनी बीड प्रकरणावरून अनेक प्रश्न त्यांना विचारले. यावर अजित पवार यांनी देखील काहीशी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. मात्र, आमदार सुरेश धस यांनी उल्लेखिलेल्या बडी मुन्नी नेमकी कोण असे विचारताच अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, विरोधकांकडे पुरावे असतील तर ते न्यायालयाला द्या, सीआयडीला द्या, एसआयटीला द्या. पण पुरावे नसताना आरोप करणे कितपत योग्य आहे असा सवाल देखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, एसआयटीची चौकशी सुरू आहे, सीआयडीची चौकशी सुरू आहे, या सर्व चौकशी सुरू असताना त्यात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले आहे की या सगळ्यात जो कोणी दोषी आढळून येईल त्यावर कठोर कारवाई केली जाईल. यात मी देखील मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो, तेव्हा त्यांना सांगितले की कोणीही कोणत्याही पक्षाचा असला आणि जर तो दोषी आढळला तर कारवाई करा, यावर त्यांनी मी देखील याच मताचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्यात कोणावर देखील अन्याय होणार नाही याची देखील आम्हाला खबरदारी घ्यावी लागते. तसेच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
काय म्हणाले होते आमदार सुरेश धस?
आमदार सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी तेच इतिहासातील आका असा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आमदार सुरेश धस म्हणाले होते, अमोल मिटकरी सारख्या बारक्या-सारक्या लेकरांना कशाला बोलायला लावतो. बडी मुन्नीने पुढे यावे, बडी मुन्नीलाही माहीत आहे. त्या मुन्नीने पुढे यावे. मी मुन्नीची सुन्नी करतो. अमोल मिटकरींचा बोलवता धनी हा बडी मुन्नी आहे. अमोल मिटकरी हे पहिली दुसरीच्या वर्गात आहेत, चड्डीत असल्यापासून ते आतापर्यंत तुम्ही जे आरोप केले आहेत त्या सर्वात क्लीनचीट मिळाली आहे. संतोष देशमुख खुनापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे. माझाही सीडीआर काढा. मी कोणत्या कामासाठी वाल्मीक कराडला फोन केला, कोणत्या कारणासाठी केला होता तेही त्यांनी जाहीर करावे, असा पलटवार सुरेश धस यांनी केला आहे. तसेच बडी मुन्नी ही महिला नसून पुरूष असल्याचेही धस यांनी म्हंटले आहे.





