नवी दिल्ली – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भारतीय संघात पुनरागमन करेल का, हा प्रश्न करोनापेक्षाही महत्त्वाचा बनवला जात आहे. सध्या तर प्रत्येकजण उठत असून धोनी पुनरागमन करणे कठीण असल्याचेच सांगत आहे. निवड समितीचे माजी अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद, माजी कसोटीपटू गौतम गंभीर, माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत व माजी कसोटीपटू व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनीही धोनी पुनरागमन करणे शक्य नसल्याचे मत व्यक्त करत आता त्याच्या पुनरामगनाबाबत कोणीही गंभीर नसल्याचेच स्पष्ट होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक व माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी धोनीने जर आयपीएलमध्ये आपली तंदुरुस्ती व कामगिरी सिद्ध केली तर त्याला संघात स्थान मिळेल, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर निवड समितीनेही त्याच्याशी चर्चा करून त्याला एक संधी मिळेल, असेही संकेत दिले होते. मात्र, आता त्याच्यासाठी संघात जागाच नाही इतक्या पराकोटीची मते व्यक्त केली जात आहेत. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पराभूत झाल्याने भारतीय संघाचे आव्हान संपले होते. त्या सामन्यातच नव्हे तर या संपूर्ण स्पर्धेत धोनीच्या संथ फलंदाजीवरही प्रचंड टीका झाली होती. त्यानंतर धोनीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. जवळपास आठ महिन्यांनंतर धोनी आयपीएलमधील त्याच्या चेन्नई सुपरकिंग या संघाच्या सराव सत्रात सहभागी झाला होता. त्यात धोनीने सराव सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत आपण पुनरागमनासाठी सज्ज होत असल्याचा दाखला दिला होता. मात्र, करोनाचा धोका वाढू लागल्याने हे सराव सत्र बंद झाले व धोनीसह सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले.आता करोनावर कधी नियंत्रण येणार व लॉकडाऊन संपल्यावर स्पर्धा तसेच विविध सराव सत्र कधी सुरू होणार याचीच उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. धोनीने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली तर त्याच्या निश्चितच विचार केला, जाईल असेही संकेत मिळत आहेत. एक संधी मिळेल….. धोनीची यापूर्वीची कामगिरी तसेच त्याची उपयुक्तता पाहता त्याला अपमानीत करून निवृत्ती घ्यावी लागू नये यासाठी त्याला एक संधी निश्चितच मिळेल, असे संकेत मंडळाने दिले आहेत. मात्र, आयपीएल रद्द झाली तर त्याला कधी व कशी संधी देणार हा देखील प्रश्न कायम आहे. भारतीय संघात पुनरागमन करून ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत खेळूनच मैदानावरच निवृत्ती जाहीर करायची अशी त्याची इच्छा असली तरी हा योग जुळून येणार का ? हाच काय तो प्रश्न आहे.