‘मी 5 वर्षातून एकदा जुगार खेळतो, आत गेलो तर भिंगऱ्या भिंगऱ्या….’ – राज ठाकरे

Raj Thackeray : 2014-2019 च्या दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारने केल्या त्या मला पटल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा मी जाहीर विरोध केला. त्या गोष्टी मला आजही पटत नाहीत. त्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट असणे गरजेची आहे. तसा मी अगदी सरळ माणूस आहे. ज्या गोष्टी पटल्या त्यांचा जाहीर सपोर्ट करणारा मी व्यक्ती आहे. आणीबाणीच्या काळापासून मी जे काही वाचलं, तेव्हापासून 370 रद्द करण्याचा मुद्दा सुरू आहे. हा मुद्दा चालत आलेला आहे. ते केवळ मोदी सरकारमुळे झाले, हे तुम्हाला मान्य करावंचं लागेल. अनेकदा हा मुद्दा उठवला, परंतु त्यावर कोणी बोललेच नाही, असे राज ठाकरे म्हणाले. भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
राम मंदिराबाबत बोलताना राज म्हणाले, ज्यावेळी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा कारसेवकांचा मुद्दा उपस्थित झाला. अयोध्येत कारसेवक हे मोठ्या संख्येने तिथे गेले. मात्र तेव्हा झालेला गोळीबार हा मी आजही विसरू शकत नाही. तर आज मोदी सरकारमुळे हे राम मंदिर उभे राहिले आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली. मोदींमुळेच हे शक्य आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका –
2019 ला मी ज्या गोष्टींवर बोललो आहे, त्या बाबी बोलण्याची हिंमत ही आजच्या विरोधकांमध्ये नाही. कारण मी स्पष्ट होतो. मला भूमिका पटली नाही, म्हणून मी विरोधात गेलो. परंतु मला पद मिळालं नाही म्हणून मी तुमच्यासोबत नाही. अडीच वर्षे जर मान्य केले असते, तर तुम्ही आज जे बोलत आहात, ते तु्म्ही तेव्हा बोलले असता का? असा सवालही राज ठाकरेंनी केला. ते म्हणाले की, सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही गप्प होता, मग सत्ता गेली म्हणूनच तर तुम्ही इतकी कठोर भूमिका घेऊन बोलत आहात. उद्धव ठाकरे साडे सात वर्षे सत्तेत होते मग त्यांनी तेव्हा राज्यातून गेलेल्या प्रकल्पांबद्दल बोलायला हवं होतं. मग तेव्हा त्यांनी का विरोध केला नाही, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मी पाच वर्षात एकदा जुगार खेळतो –
मी पक्षाची स्थापना केली होती, तेव्हा एक उदाहरण दिले होते. आज पुन्हा ते उदाहरण देतो. मी मलेशियाला गेलो होतो. तिथे जेंटिक हायलंड नावाची एक जागा आहे. आता अनेक लोक गेली असतील. मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे केवळ एक हॉटले होतं. साधारण ते मुंबई ते माथेरान एवढं अंतर होतं. तिथे पोहोचलो. मी सहज आपला चोची मारत होतो. विचारपूस केली. म्हटलं इथे काय आहे? ते म्हणाले इथं कसिनो आहे. त्यानंतर मी संध्याकाळी शर्मिला आणि आमच्या बरोबरचे दोघे तिघे जण खाली कसिनोमध्ये गेलो. मला जुगार खेळता येत नाही. 5 वर्षातून एकदा खेळतो. आतमध्ये गेलो तिकडे भिंगऱ्या भिंगऱ्या फिरवत होते. मी 10 मिनीटांत बाहेर पडलो. त्यानंतर मी बाहेर आलो तिकडे एक बार होता. तिथे बसलो”, असे मनसे अध्यक्ष राजे ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.





