मंत्री गिरीश महाजन जखमी: ट्रकचा रॉड डोक्याला लागला, कार्यकर्त्यांची धावपळ

नाशिक: वीर जवान अर्जुन बाविस्कर यांना श्रद्धांजली वाहताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा लोखंडी रॉड लागल्याने ते जखमी झाले. ही घटना वरणगाव येथे घडली. डोक्यातून रक्त येत असतानाही त्यांनी प्राथमिक उपचार घेऊन जवानाच्या अंत्ययात्रेत भाग घेतला आणि नंतर महत्त्वाच्या बैठकीसाठी नाशिकला रवाना झाले. या घटनेमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता.
काय घडलं?
वरणगाव येथील वीर जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी गिरीश महाजन आज सकाळी गावात पोहोचले होते. जवानाच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी ते लष्कराच्या ट्रकवर चढले असताना वरचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला जोरात लागला. यामुळे डोक्यातून रक्त वाहू लागलं. तरीही त्यांनी पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केलं. रक्त थांबत नसल्याने त्यांना तातडीनं जवळच्या निमजाय हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.
जखमी अवस्थेतही कर्तव्याला प्राधान्य –
उपचारानंतर गिरीश महाजन यांनी बाविस्कर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. “अर्जुनला देशसेवेत वीरमरण आलं, याचं दुःख आहे. पण मी आणि राज्य सरकार तुमच्या सोबत आहे,” असं त्यांनी कुटुंबाला सांगितलं. डोक्याला दुखापत असूनही ते अंत्ययात्रेत तिरंगा सर्कलपर्यंत चालत गेले आणि हजारो लोकांसह जवानाला मानवंदना दिली. त्यानंतर नाशिकला महत्त्वाची बैठक असल्याचं सांगत ते जखमी अवस्थेतच वाहनाने निघाले.
कार्यकर्त्यांची धावपळ –
मंत्री महाजन जखमी झाल्याची बातमी पसरताच त्यांच्या समर्थकांमध्ये एकच धांदल उडाली. पण त्यांनी स्वतः शांत राहून कर्तव्य पार पाडलं आणि नंतर नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाले. या घटनेनंतर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, पण त्यांनी आपलं काम थांबवलं नाही.





