Maruti Suzuki : तेल बचतीसाठी मारुती-सुझुकीचे मोठे पाऊल; कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’, कारपूलिंगचा सल्ला
Maruti Suzuki : वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारूती सुझुकीने पेट्रोल बचत आणि परकीय चलन वाचवण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत.

Maruti Suzuki : वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारूती सुझुकीने पेट्रोल बचत आणि परकीय चलन वाचवण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास, कारपूलिंगचा (एकाच वाहनातून एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या विविध व्यक्तींनी एकत्र प्रवास करणे) वापर करण्यास तसेच सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे.
इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम भारताच्या परकीय चलन साठ्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर मारुती-सुझुकीने अनावश्यक इंधन वापर टाळण्यासाठी अंतर्गत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कंपनीने सामाजिक माध्यम ‘एक्स’वर याबाबत माहिती दिली.
परदेश दौरे टाळण्याचे आवाहन –
कंपनीने कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक नसल्यास परदेश दौरे टाळण्याचे तसेच देशांतर्गत प्रवासही कमी करण्याचे आवाहन केले आहे. कारखान्यातील कर्मचाऱ्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
हेही वाचा – अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने दिला प्रत्युत्तराचा इशारा, पेट्रोल आणखी महाग होणार?
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कच्चे तेल आयात करणारा देश आहे. इराण संकटानंतर तेलाच्या किमती सातत्याने वाढत असून सरकारने अलीकडेच पेट्रोल-डिझेल दरात सलग चौथ्यांदा वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार वाढला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मारुती-सुझुकीने जून महिन्यापासून वाहनांच्या किमतीत ३० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि महागाईमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने सांगितले होते. त्यामुळे ग्राहकांना वाहनांच्या वाढलेल्या किमतींसह महागड्या इंधनाचाही फटका बसणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी नागरिकांना इंधन बचत करण्याचे, अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे आणि सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन केले होते. मारुती-सुझुकीचे हे पाऊल त्या दिशेनेच महत्त्वाचे मानले जात आहे.





