-अन्नधान्य, किराणा मिळण्याचा मार्ग मोकळा
-सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहणार हा विभाग
पुणे – मार्केट यार्डातील गुळ-भुसार बाजार आजपासून (गुरूवार दि. 26) सुरू करण्याचा निर्णय दि पुना मर्चंट्स चेंबरने घेतला आहे. सकाळी दहा ते दुपारी या वेळेत बाजार खुला राहणार आहे. आज दि पूना मर्चंटस् चेंबरच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. मात्र, याकाळात बाजार आवारातील किरकोळ विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच भुसार बाजार बंद झाल्याने शहरात अन्नधान्य आणि किराणाचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. तर दुसरीकडे माल महाग विकला जाईल, असेही काहींना वाटत होते. त्यामुळे मागील दोन दिवसात नागरिकांनी खरेदीसाठी जवळच्या किराणा दुकानात गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर भुसार बाजार सुरू राहण्याचा निर्णय निर्णय दिलासादायक आहे.
भाजीपाला विभाग सुरू करण्याबाबतचा निर्णय दोन दिवसात – विलास भुजबळ
मार्केटयार्डातील भाजीपाला विभाग सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई येथील घाऊक बाजारानंतर राज्यातील प्रमुख बाजार सुरू करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात आडते असोसिएशनच्या कार्यकारिणीची बैठक पार पडेल. बैठकीत बाजार सुरू करायचा की 31 मार्च पर्यंत बंद ठेवायचा यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. दरम्यान कामगार संघटनांचीही लवकरच बैठक होणार असल्याचे यावेळी सांगितले.