मनोज जरांगे यांनी घोषणा देणाऱ्यांना झापलं; म्हणाले – मी कशाला बसलोय?

जालना – अंतरवाली सराटी गावात सुरु असलेले मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन अद्याप सुरुच आहे. सातत्याने सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी तसेच विरोधी पक्षातील नेतेमंडळी आंदोलनस्थळी भेट देत आहेत. आज राज्याचे मंत्री गिरीश महाजन, अर्जुन खोतकर यांसह इतर नेत्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्य सरकारची भूमिका त्यांना सांगितली. यावेळी उपोषणस्थळी मोठी गर्दी झाली होती.
चर्चा सुरु असताना काही मराठा समाजबांधवांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा दिली. त्यावेळी जरांगे यांनी मी कशाला बसलोय? चर्चा बंद करायची का? घोषणा देऊन आजपर्यंत काय मिळाले? घोषणा देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. मी इथं तुमच्यासाठी मरतोय… तुम्हाला आरक्षण मिळवून देणारच… असे म्हणत त्यांनी घोषणा देणाऱ्यांना शांत करून चर्चा सुरु ठेवली.
दरम्यान यावेळी जरांगे यांनी आरक्षणाचा ठोस निर्णय जोपर्यंत होत नाही तोवर उपोषण सोडणार नसल्याचे सांगितले. तसेच सध्या फक्त पाणी पिणे सुरु असून उद्यापासून पाणीही पिणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेच्या दरम्यान बोलताना मराठवाड्यातील मराठ्यांनी काय वाईट केलं असा प्रश्न मनोज जरांगे यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना केला.
दरम्यान, जरांगे यांची प्रकृती पाहता त्यांनी उपोषण मागे घेतले पाहिजे, सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक असून एक महिन्याचा वेळ देण्याची मागणी महाजन यांच्याकडून केली गेली. आम्हाला आरक्षण हवं आहे, मराठवाड्यातील मराठ्यांनी काय केलं? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी यावेळी महाजन यांना विचारला.
मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या –
शासनाने एक स्पष्टीकरण पत्र काढावे. त्यात, “महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात क्र. 83 वरील कुणबी जाती-अंतर्गत “मराठा कुणबी वा कुणबी मराठा” ही जात समाविष्ट आहे. सदरील मराठा कुणबी वा कुणबी मराठी ही जात म्हणजेच मराठा जात आहे, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. मराठवाडा (औरंगाबाद), महसुली विभागातील मराठा जातीचा उल्लेख असलेल्या व्यक्तींना “कुणबी” जातीचे दाखले देण्यात यावेत,” अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तर ही मागणी मान्य देखील झाली असल्याचे बोलले जात आहे. पण फक्त दाखले नव्हे तर त्यासोबत आरक्षण देखील मिळाले पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.




