मोठी बातमी! तुर्तास लाॅकडाऊन नाहीच; पण, गर्दी टाळण्यासाठी ‘हा’ निर्णय होण्याची शक्यता

मुंबई – वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. रात्रीच्या जमावबंदीचेही आदेश आहेत. तरी देखील राज्यातील करोनाबाधितांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे. संपूर्ण लाॅकडाऊन केले तर गरीब, कष्टकरी वर्गाचे जगणे कठीण होणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेकडून तसेच विरोधी पक्ष व सरकारमधीलही काही प्रतिनिधींकडून लाॅकडाऊनला मोठा विरोध आहे.
त्यामुळे करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून लाॅकडाऊन न लावता काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानुसार, ‘वर्क फ्राॅम होम’साठी सरकारची चाचपणी सुरु आहे. लाॅकडाऊनपेक्षा जास्तीत जास्त लोकांना घरी बसून कसं काम करता येईल यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. नागरिक घरी राहिल्यास रस्त्यावरची गर्दी कमी होईल, ट्रेन, बस, आणि मेट्रोची गर्दी कमी होईल. त्यामुळे लवकरच वर्क फ्राॅम होम सुरु होण्याची शक्यता आहे.
आयटी सेक्टर व इतर ऑफिसेसला सरकार ‘वर्क फ्राॅम होमसा’ठी आदेश देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, सध्या लाॅकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास करोना संसर्ग नक्कीच आटोक्यात येईल. लाॅकडाऊनची स्थिती उद्भवणार नाही. मात्र, जर परिस्थिती हाताबाहेर गेलीच तर लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.





