Maharashtra Scholarship Exam: 5वी, 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा यंदा ‘अखेरची’; पुढील वर्षापासून ‘या’ वर्गांसाठी घेतली जाणार

Maharashtra Scholarship Exam: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवी या इयत्तांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा यंदा शेवटची ठरणार आहे. विशेष म्हणजे, या अखेरच्या वर्षात विद्यार्थी नोंदणीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील वर्षापासून ही परीक्षा पुन्हा एकदा चौथी आणि सातवीच्या स्तरावर घेतली जाणार असल्याने, यंदाच्या परीक्षेला राज्यभरातून विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ आणि २०२५ च्या तुलनेत यंदा नोंदणीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. पाचवीच्या परीक्षेसाठी गेल्या वर्षी ५ लाख ६६ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तो आकडा यंदा थेट ६ लाख ४९ हजार ८७५ वर पोहोचला आहे. तर आठवीच्या परीक्षेसाठी देखील यंदा ३ लाख ८२ हजार ४९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही राज्यव्यापी परीक्षा २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या विद्यार्थी संख्या वाढीमागे प्रामुख्याने दोन कारणे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने शिष्यवृत्तीच्या रकमेत केलेली वाढ आणि पाचवी-आठवीसाठी असलेली ही शेवटची संधी यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा वाढला आहे. जिल्हा परिषदा आणि महापालिकांकडून होणारा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे नोंदणीचा आलेख उंचावला असल्याचे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले.
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार २०१६-१७ पासून ही परीक्षा पाचवी आणि आठवीसाठी घेतली जात होती. मात्र, या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागावर परिणाम झाल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण विभागाने पुन्हा जुन्या पद्धतीनुसार चौथी आणि सातवीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाची पाचवी आणि आठवीची परीक्षा ही या स्वरूपातील अखेरची परीक्षा ठरणार असून, पुढील वर्षापासून चौथी आणि सातवीसाठी स्वतंत्रपणे परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे.

