Coronavirus : चिंताजनक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र

मुंबई – राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लॉकडाऊन आणि तत्सम नियमांच्या कडक अंमलबजावणीनंतर काही अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. हेच चित्र पाहता, अखेर प्रशासनाने टप्प्याटप्प्याने राज्यात लागू असणारे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर काही जिल्ह्यांमध्ये मात्र करोना रुग्णसंख्येचा आलेख चढताच होता, पण अखेर या चिंताजनक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यातील जिल्ह्यांचा आज पॉझिटिव्हिटी रेट आणि व्याप्त खाटांची संख्या याची आठवड्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली.

कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये नियमांची अंमलबजावणी सक्‍तीने सुरू असतानाच परिणामार्थ अनलॉकनंतरच्या तिसऱ्या आठवड्यात करोनाचा संसर्ग कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरत आहे.

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट घसरला असला तरी आणखी काही दिवस परिस्थिती नियंत्रणात येण्याचे प्रयत्न करून पुढील आठवड्यात मुंबईला लेव्हल-2मध्ये आणण्यासाठी विचार केला जाईल, असे मुंबई महापालिका आयुक्‍त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.

पॉझिटिव्हिटी रेट हा पुढील आठवड्यात 2 ते 2.5 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी झाला तर नक्कीच मुंबई लेव्हल 2 मध्ये आणण्याचा विचार करून आणखी नियमांमध्ये शिथिलता आणली जाईल.

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा मागील आठवड्यात 4.40 होता. या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट घटून 3.79 टक्के झाला आहे. मात्र, आजही मुंबईत 600 ते 700 करोना रुग्ण नव्याने आढळत आहे. ही संख्या 500 पेक्षा कमी व्हावी.

जर मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट एक ते दीड झाला तर आपण मुंबई करोनाच्या परिस्थितीबाबत कंट्रोलमध्ये आली, असे म्हणू शकतो. त्यामुळे लेव्हल 2 बाबत पुढच्या आठवड्यात स्थिती सुधारल्यानंतर विचार करू, असे आयुक्‍त चहल यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.