Mahadev Jankar RSP: विधानसभा निवडणूक जाहीर होताच ‘महायुती’ला धक्का; मित्रपक्षाने साथ सोडली

Mahadev Jankar RSP – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व 288 मतदारसंघात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल आहे. त्यामुळे राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आज, उद्या महायुती आणि मविआतील पक्षांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच सत्ताधारी महायुतीला निवडणुक जाहीर झाल्यानंतर पहिला फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीतील मित्रपक्ष रासपने महायुतीची साथ सोडली असून एकला चलो रेचा नारा दिला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडले असून राज्यात विधानसभेच्या सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. विधानसभेच्या जागावाटपावर ते नारास असल्याची चर्चा आहे. त्याच नाराजीतून त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जानकरांची शरद पवार यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. पण अखेर महायुतीने चर्चेतून त्यांना आपल्याकडे खेचले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना महायुतीतून परभणी लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र येथे त्यांचा पराभव झाला आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी झाले.
जानकर यांनी स्वत: 2009 साली माढा मतदारसंघ, 2014मध्ये बारामती लोकसभा लढवली होती. येथे दोन्ही वेळा ते पराभूत झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात जानकर यांना विधानपरिषदेचे आमदार करण्यात आले होते. यावेळी फडणीवस मंत्रीमंडळात त्यांच्याकडे पशूपालन, डेअरी विकास आणि मत्स्यपालन खाते देण्यात आले होते.
दरम्यान, आज सकाळी महायुतीची पत्रकारपरिषद झाली. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआयचे रामदास आठवले आणि सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती. मात्र महादेव जानकर यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे तेव्हाच यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात होते. अखेर महादेव जानकरांनी निर्णय घेतला असून त्यांनी एकला चलो चा नारा दिला आहे.
जागा वाटपात रासपचा विचार केला गेला नसल्याचा आरोप जानकरांनी केला आहे. एक ते दोन दिवसांत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या राज्यात रासपचा एक आमदार आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील रत्नाकर गुट्टे हे राज्यातील रासपचे एकमेव आमदार आहेत. महादेव जानकर यांनी 2003 साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार आहे.





