लोकसभा2019 : सार्वजनिक सुट्ट्या उमेदवारांच्या पथ्यावर

प्रचाराला वेग येणार : आता उरला 15 दिवसांचा कालावधी

पिंपरी – प्रचाराला जेमतेम 15 दिवस राहिल्याने मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची प्रचारासाठी दमछाक झाली आहे. सण उत्सव व रविवार मिळून पाच सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे या कालावधीमध्ये प्रचाराला गती देण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून नियोजन करण्यात आले आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघातून 23 तर मावळमधून 21 उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत. 29 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचारासाठी जेमतेम 15 दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी दिवस-रात्रं एक करावा लागणार आहे. प्रचारामध्ये उद्याचा व पुढील आणखी एका रविवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. यानिमित्त दोन्ही मतदार संघांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेसह विविध सामाजिक संस्था, संघटनांनी कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे.

17 एप्रिलला महावीर जयंती आहे. 19 तारखेला हनुमान जयंती व गुड फ्रायडे आहे. कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये रॅलीचे आयोजन करावे. उमेदवारांची माहिती देणारी पत्रके प्रत्येक घरोघरी जाऊन वितरण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रभागनिहाय रॅलींचेही या कालावधीमध्ये आयोजन केले जाणार आहे.

सर्वच पक्षाच्या नेत्यांना प्रचारासाठी 15 दिवस असले तरी दोन रविवार व सण उत्सवाच्या तीन सुट्या हे पाच दिवस महत्त्वाचे आहेत. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांची भेट घ्यावी. उमेदवारांची माहितीपत्रके बंद दरवाजामध्ये टाकण्याऐवजी प्रत्यक्ष नागरिकांची भेट घेऊन त्यांना देण्याची सूचना उमेदवारांकडून समर्थकांना करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.