“…तर अमोल मिटकरी आणि अजित पवारांच्या अंगावर कपडे राहणार नाही” – लक्ष्मण हाके

पुणे: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना ‘पोल्ट्री फार्मवाले’ संबोधले. गेल्या २० वर्षांपासून अर्थखात्याला चिकटून बसलेल्या अजित पवारांनी भटके-विमुक्त आणि मागासवर्गीय महामंडळांना ‘५० पैसेही’ दिले नसल्याचा आरोप हाके यांनी केला.
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हाके यांच्या फॉर्च्यूनर गाडीवरून टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर देताना हाके यांनी मिटकरींना ‘बाजारू विचारवंत’ म्हणत, “मी त्यांच्या भाषेत बोललो, तर मिटकरी आणि अजित पवार यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत,” असा इशारा दिला.
हाके म्हणाले, “फॉर्च्यूनर माझे साधन आहे, साध्य नाही. मिटकरी अजित पवारांच्या घरी झाडू मारतात, त्याबदल्यात त्यांना आमदारकी मिळाली.” त्यांनी मिटकरींना ओबीसींसाठी बोलण्याचा आणि अजित पवारांनी वसतिगृहांसाठी निधी देण्याचा प्रश्न उपस्थित केला. हाके यांनी अजित पवारांवर ‘काकांच्या जीवावर पुढे आले’ असा टोला लगावत, आण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी मिळतात, पण ओबीसी महामंडळांना दोन-तीन कोटीही मिळत नसल्याचे म्हटले.
हाके यांनी महाराष्ट्रात विरोधकच उरले नसल्याचा दावा करत, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे भाजपात सामील झाल्याचा आरोप केला. “सामान्य माणसाचा आवाज दाबला जात आहे. आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.





