7000 श्री सदस्यांना…; खारघरमध्ये कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने दिली धक्कादायक माहिती

ठाणे – खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूनंतर याविषयी सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. या सोहळ्यातील किती जणांना त्रास झाला, किती जणांचा बळी गेला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच या कार्यक्रमाला उपस्थित शेकडो नव्हे तर हजारो श्री सदस्यांना त्रास झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 42 डिग्री तापमानाच्या रखरखत्या उन्हात बसलेल्या श्री सदस्यांना त्रास झाल्याचे तब्बल 7000 हून अधिक कॉल प्राप्त झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. सुरुवातीला त्रास जाणवू लागलेल्या श्री सदस्यांवर कार्यक्रमाच्या जवळच आमराईखाली उभारलेल्या तंबूत उपचार केल्याने बळींची आकडा आटोक्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच 50हून अधिक अत्यवस्थ रुग्णांना तातडीने पाठीमागील बाजूस असलेल्या टाटा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु येथे कर्करोगावर उपचार होत असल्याने तेथील डॉक्टरांची एकच तारांबळ उडाली. त्यानंतर या रुग्णांना वाशी आणि कामोठेतील एमजीएम, अपोलो, डीवाय पाटील आदी नजीकच्या रुग्णालयांत श्री सदस्यांना तात्काळ हलविण्यात आले.
दुर्दैवाने त्यापैकी काही जणांना मृत अवस्थेतच रुग्णालयात आणावे लागले, अशी धक्कादायक माहिती त्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, आतापर्यंत खारघरच्या दुर्घटनेत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

