कमलनाथ यांच्यावरील कारवाईला स्थगिती; सुप्रीम कोर्ट म्हणते…

नवी दिल्ली – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्टार कॅम्पेनर यादीतील नाव काढून टाकण्याचा जो आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असा आदेश देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकारच नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे कमलनाथ यांना दिलासा मिळाला आहे.
अर्थात मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांचा प्रचार कालच संपल्या असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा कमलनाथ यांना कोणताही लाभ होणार नसला तरी तेथील प्रत्यक्ष मतदान मात्र उद्या असल्याने त्याच्या आदल्या दिवशीच कमलनाथ यांच्या बाजूने हा कौल आल्याने त्याचा त्यांना निवडणुकीतील वातावरणात लाभ होऊ शकतो.
निवडणूक आयोगाने हा जो आदेश दिला होता, त्याला कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्या अर्जावर आज सरन्यायाधीश बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी निवडणूक आयोगाच्या वकिलांना चांगलेच फैलावर घेतले.
एखाद्या नेत्याचे स्टार कॅम्पेनर यादीतील नाव ठेवण्याचा किंवा काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?, तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचे नेते आहात काय?,असे सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केले. कोणत्या राजकीय पक्षाचा कोण नेता असावा हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे कधी आला, असा सवालही सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. भाजपच्या एका महिला उमेदवाराचा आयटेम असा उल्लेख केल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर ही कारवाई केली होती.





