IAF Officer Akshita Dhankhar: राष्ट्रपतींसोबत तिरंगा फडकवणारी ही महिला अधिकारी कोण? लेफ्टनंट अक्षिता धनखर यांची संपूर्ण कहाणी जाणून घ्या…
IAF Officer Akshita Dhankhar: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ध्वजारोहणात सहकार्य करण्याचा ऐतिहासिक बहुमान भारतीय हवाई दलाच्या (IAF) फ्लाइट लेफ्टनंट अक्षिता धनखर यांना मिळाला.

IAF Officer Akshita Dhankhar: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महिला शक्तीचा जयघोष पाहायला मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ध्वजारोहणात सहकार्य करण्याचा ऐतिहासिक बहुमान भारतीय हवाई दलाच्या (IAF) फ्लाइट लेफ्टनंट अक्षिता धनखर यांना मिळाला. हरयाणाच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज देशातील कोट्यवधी मुलींसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
वडिलांचा वारसा आणि एनसीसीचे बाळकडू –
Flight Lieutenant Akshita Dhankhar
अक्षिता या मूळच्या हरयाणातील झज्जर जिल्ह्यातील कसनी गावच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात कार्यरत होते. वडिलांना गणवेशात पाहून अक्षिता यांच्या मनातही बालपणापासूनच देशसेवेचे स्वप्न रुजले होते. दिल्ली विद्यापीठाच्या श्री गुरु तेग बहादूर खालसा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी एनसीसी (NCC) मध्ये प्रवेश घेतला. एनसीसीच्या शिस्तीने आणि प्रशिक्षणाने त्यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या खंबीर बनवले, जे त्यांच्या वायुसेनेतील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर गरुडझेप –
भारतीय हवाई दलात स्थान मिळवणे आव्हानात्मक होते, मात्र अक्षिता यांनी पहिल्याच प्रयत्नात एएफसीएटी (AFCAT) परीक्षा उत्तीर्ण केली. म्हैसूर येथील कठीण मुलाखती आणि चाचण्या पार करून त्यांची निवड वायुसेनेच्या प्रशासकीय शाखेत झाली. जून २०२३ मध्ये त्या ‘फ्लाईंग ऑफिसर’ बनल्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे लवकरच त्यांना ‘फ्लाइट लेफ्टनंट’ ही जबाबदारी देण्यात आली.
“राष्ट्रपतींसोबत तिरंगा फडकवण्याची संधी मिळणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. हा सोहळा पाहून देशातील तरुण पिढी नक्कीच प्रेरित होईल आणि वायुसेनेत सामील होण्याचे स्वप्न पाहिल,” अशी भावना अक्षिता धनखर यांनी व्यक्त केली.
कर्तव्यपथावर ‘नारी शक्ती’चे दर्शन –
यंदाच्या संचलनात केवळ अक्षिताच नव्हे, तर इतर महिला अधिकाऱ्यांनीही आपली छाप सोडली. सीआरपीएफच्या सहाय्यक कमांडंट सिमरन बाला यांनी १४० पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व केले. स्क्वाड्रन लीडर निकिता चौधरी यांनी हवाई दलाच्या पथकाचे नेतृत्व करून महिलांच्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. वायुसेनेच्या बँड पथकात ९ महिला अग्निवीरांचा सहभाग हे यंदाच्या परेडचे प्रमुख आकर्षण ठरले. अक्षिता धनखर यांच्या या यशामुळे केवळ हरयाणाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील मुलींना संरक्षण दलात करिअर करण्याची नवी उमेद मिळाली आहे.





