Hardeep Singh Puri : भारतावर घोंघावतंय मोठं तेल संकट ? हरदीप पुरी यांच्या वक्तव्यामुळे चिंता वाढली
Hardeep Singh Puri : भारत सध्या सुरक्षित स्थितीत असला, तरी खाडीतील वाढते तणावपूर्ण वातावरण आगामी काळात जागतिक ऊर्जा बाजार आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची कसोटी ठरू शकते.

Hardeep Singh Puri : केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या पुढील ७६ ते ८० दिवसांच्या गरजा पूर्ण करता येतील एवढाच तेल साठा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, खाडीतील संघर्ष इतर देशांपर्यंत पसरल्यास परिस्थिती गंभीर बनू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
मध्य पूर्व हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांचा प्रदेश मानला जातो. भारत आपल्या ऊर्जा गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर या भागावर अवलंबून आहे. त्यामुळे या प्रदेशातील कोणत्याही अस्थिरतेचा परिणाम थेट कच्च्या तेलाच्या किंमतींवर आणि जागतिक ऊर्जा बाजारावर होण्याची शक्यता असते.
तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता –
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी म्हणाले की, भारताकडे सध्या धोरणात्मक तसेच व्यावसायिक स्वरूपातील पुरेसा तेलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे तातडीच्या संकटाची भीती नाही. मात्र, संघर्षाचा विस्तार झाल्यास जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो आणि तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
भारत जगातील तिसरा सर्वात मोठा कच्चे तेल आयात करणारा देश –
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्चे तेल आयात करणारा देश आहे. देशाच्या एकूण गरजेपैकी सुमारे ८५ टक्के कच्चे तेल आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतवाढीचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांपासून महागाईपर्यंत सर्वच क्षेत्रांवर होतो.
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, खाडी क्षेत्रातील तणाव आणखी वाढल्यास कच्च्या तेलाचा दर पुन्हा १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे जाऊ शकतो. त्याचा परिणाम वाहतूक, उद्योग, अन्नधान्य तसेच सर्वसामान्यांच्या खर्चावर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारताने तेल खरेदीचे स्रोत विविध देशांमध्ये विभागल्याने काही प्रमाणात धोका कमी झाला आहे. रशिया, अमेरिका, ब्राझील आणि आफ्रिकेतील काही देशांकडूनही भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करीत आहे.
जागतिक घडामोडींवर बारकाईने लक्ष –
केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यानुसार सध्या भारताची ऊर्जा सुरक्षा भक्कम असली तरी मध्य पूर्वेतील तणाव दीर्घकाळ कायम राहिला किंवा संघर्षाचा विस्तार झाला, तर देशासह जगासमोर ऊर्जा पुरवठ्याचे नवे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे केंद्र सरकारकडून जागतिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून पर्यायी पुरवठा व्यवस्थांवरही काम सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारत सध्या सुरक्षित स्थितीत असला, तरी खाडीतील वाढते तणावपूर्ण वातावरण आगामी काळात जागतिक ऊर्जा बाजार आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची कसोटी ठरू शकते.





