नवी दिल्ली – करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी काहीही हातचे न राखता मदत करत असलेल्या गौतम गंभीरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी कसोटीपटू व सध्याचा खासदार असलेल्या गंभीरने करोनाग्रस्तांसाठी आता चौथ्यांदा मदतीचा हात दिला आहे. सोशल मीडियावर गंभीरच्या या कार्याला नेटकऱ्यांनी सलाम केला आहे.
देशात लॉकडाऊन असल्याने तसेच करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत असल्याने शुक्रवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना मदत तसेच सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. गंभीरने मात्र त्यापूर्वीच आपल्या सामाजिक जाणिवेची साक्ष देत प्रथम 50 लाख, नंतर 1 कोटी त्यानंतर आपला खासदारकीचा 2 वर्षांचा पगार करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिला होता. आताही त्याने पुन्हा एकदा पुढाकार घेत मास्क आणि प्रोटोक्टिव्ह कीटचे मोफत वाटप केले. एकीकडे अब्जाधीश क्रिकेटपटू अद्यापही मदतीसाठी पुढे आलेले नसताना गंभीरने मात्र आपल्या कार्याने करोनाग्रस्तांच्या मानसिकतेलाही सकारात्मक वळणावर आणले आहे.
येथील लाल बहादूर शास्त्री हॉस्पिटलच्या डॉक्टर व कर्मचारी लोकांमध्ये या कीट आणि मास्कचे वितरण करण्यात आले. खुद्द गंभीरनेच याबाबतची छायाचित्रे व माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली.
रुग्णांच्या कुटुंबीयांनी जबाबदारी ओळखावी…
गेल्या काही दिवसांपासून करोनाची लागण झालेल्या रुग्णांचे नातेवाईक तसेच कुटुंबीय हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी यांच्याशी गैरवर्तन करत आहेत. काही ठिकाणी तर त्यांच्यावर हल्लेही झाले आहेत. यावर नाराज होत गंभीरने परिस्थितीचे गांभीर्य व आपली जबाबदारी रुग्णांच्या कुटुंबीयांनी ओळखली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. ही मंडळी रात्रीचा दिवस करून रुग्णांसाठी स्वतः धोका पत्करून काम करत आहेत, त्यांच्याबाबत असे प्रकार घडू नयेत, असेही त्याने स्पष्ट केले.