नवी दिल्ली – विरोधकांकडून निवडणूक प्रक्रियेबद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. प्रामुख्याने, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (इव्हीएम) विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम हैं कहना अशा शब्दांत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका उघड केली. हरियाणात नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत बाजी मारत भाजपने सत्ता राखल्याने कॉंग्रेसचा स्वप्नभंग झाला. हरियाणातील निकाल कॉंग्रेसने अमान्य केला. तसेच, इव्हीएमविषयी काही प्रश्न उपस्थित केले. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी कुमार यांचे लक्ष निवडणूक प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याकडे वेधले. प्रत्येक निवडणुकीगणिक त्या प्रक्रियेतील सहभाग वाढताना दिसत आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट होत आहे. विविध मुद्देमालाची विक्रमी जप्ती होत आहे. निवडणूक प्रक्रियेवर विश्वास असल्याचे स्पष्ट संकेत मतदार कृतीतून देत आहेत, असे उत्तरादाखल कुमार म्हणाले. कविता, शायरी, वाक्प्रचार यांचा वापर कुमार सातत्याने भूमिका मांडताना करत असल्याचे याआधीही पत्रकार परिषदांमधून समोर आले.