ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊस भाषणांवर मोठ्या वाहिन्यांनी बहिष्कार का टाकला?; जाणून घ्या

न्यूयॉर्क – अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष सध्या सुरू असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील मतमोजणी विषयी सतत खोटी माहिती देत असल्याने तेथील एबीसी, सीबीएस आणि एनबीसी अशा मोठ्या वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसवरून होणाऱ्या भाषणांच्या प्रसारणांवर अघोषित बहिष्कार घोषित केला आहे.
ट्रम्प यांच्या तेथून होणाऱ्या भाषणात चक्क खोटी माहिती व दावे ते करीत असल्याने टीव्ही वाहिन्यांनाच मनस्ताप सहन करावा लागला असल्याने त्यांनी ट्रम्प यांची भाषणे थेट स्वरूपात प्रसारीत करणे आता थांबवले आहे. मतदान आणि मतमोजणीतील गैरव्यवहारांविषयी त्यांनी भलतेसलते दावे आता सुरू केल्याचे टीव्ही वाहिन्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी असा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते.
एनबीसी वाहिनीने तर त्यांच्या भाषणाचे प्रसारण मध्येच थांबवताना त्यांनी खोटी महिती देणे सुरू केल्याचे लक्षात आल्याने आम्ही त्यांच्या भाषणाच्या प्रसारणात हस्तक्षेप करीत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. पराभव नजरेसमोर दिसत असल्याने ट्रम्प यांचे संतुलन बिघडले आहे अशी टिप्पणीही अनेक पत्रकारांनी टीव्हीवर प्रसारणात केली आहे.





