मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केल्याने राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात आहे. तर महाविकास आघाडीकडून मुंडेंच्या बाजूने सावध भूमिका घेत त्यांना अभय दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका पवार यांनी मांडली.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांच्यावर भाजप नेते कृष्णा हेगडे, मनसे नेते मनीष धुरी यांनी गंभीर आरोप केले. या आरोपांनंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडली.
शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी. मग आम्ही निर्णय घेऊ. त्यामुळे सध्या आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही. सत्य समोर आल्यावर निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसेच आरोप करणाऱ्या व्यक्तीविषयी इतर काही गोष्टी पुढे आल्या आहेत. आता हे प्रकरण पोलिसांत गेले आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं पक्षाच्या बैठकीत ठरले आहे. तसेच एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने या प्रकरणाचा चौकशी करावी. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सत्यता जाणून घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीदेखील धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.
“ज्या महिलने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्या महिलेवर इतर दोन नेत्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. त्यावरुन या महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे प्रतिबिंबित होत आहे. भाजपच्या एका माजी आमदाराने त्याविषयी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही कारवाई करु, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.
भाजपने आधी स्वत:कडे बघावे – सुनील केदार
या प्रकरणी कॉंग्रेस नेते आणि पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनीदेखील आपली भूमिका मांडली. “धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्यावर चौकशी सुरु आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपने स्वत:कडे बघावे. भाजप आमदार राम कदम यांनी केलेले वक्तव्यही त्यांनी बघावे, असा टोला केदार यांनी भाजपला लगावला.
चौकशी करुन कारवाई करु – अनिल देशमुख
धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “कायदा कुणावरही भेदभाव करणार नाही. या प्रकरणावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. कायद्यापुढे मंत्री मोठा नाही आणि संत्रीही नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीतून जे काही पुढे येईल त्यानुसार कारवाई करण्याती येईल, अशी तटस्थ भूमिका त्यांनी मांडली.
राजीनामा तातडीने घेऊ नये : संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेऊ नये, अशी भूमिका मांडली. “कालपासून धनंजय मुंडे प्रकरणाला जी कलाटणी मिळाली आहे, तक्रारदार व्यक्तीबाबतही अनेक तक्रारदार आहे. त्यामुळे तक्रारदार व्यक्तीबाबतचे प्रकरणही गंभीर आणि धक्कादायक वाटायला लागले आहे. ही एकच प्रवृत्ती नाही तर अशा अनेक प्रवृत्त्या आहेत ज्या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत”, असे राऊत म्हणाले.