Devram Dhome Retirement Ceremony : पिंपरखेड येथे देवराम ढोमे यांचा सेवापूर्ती सोहळा; दिलीप वळसे पाटील यांची 1 लाखांची मदत
Devram Dhome Retirement Ceremony : यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ढोमे यांना दुचाकी भेट देण्यात आली तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Devram Dhome Retirement Ceremony : आंबेगाव–शिरूर मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या संवेदनशील आणि हृदयस्पर्शी स्वभावाची प्रचिती पिंपरखेड (ता. शिरूर) येथे पार पडलेल्या सेवापूर्ती समारंभात आली. शैक्षणिक क्षेत्रात ३९ वर्षे सेवा बजावणारे श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवक देवराम धोंडीबा ढोमे यांच्या कार्यगौरव सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
देवराम ढोमे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर समाजसेवक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याचा गौरव करताना वळसे पाटील यांनी त्यांच्या सामाजिक, अध्यात्मिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत असताना त्यांनी अनेकांना संस्कार देत घडविण्याचे कार्य केल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ढोमे यांना दुचाकी भेट देण्यात आली तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. “देवराम ढोमे हे माझे जवळचे सहकारी असून त्यांनी निष्ठा आणि प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या. गावकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सेवापूर्ती सोहळा आयोजित केला, मात्र मी वैयक्तिकरित्या काही देणं लागतो,” अशी भावना व्यक्त करत वळसे पाटील यांनी त्यांच्या कुटुंबासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
या कार्यक्रमाला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती प्रकाशबापू पवार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्या सुनिता कड व कांचन सांडभोर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटशेठ थिटे, सोपान भाकरे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष वैभव उंडे, सेवानिवृत्त प्राचार्य अप्पासाहेब शेळके, माजी पोलीस उपायुक्त दयानंद ढोमे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश ढोमे यांनी केले.

