फडणवीसांकडून दरेकरांची पाठराखण

मुंबई – अनेक नेत्यांना चांगली भाषणे करता येतात. मात्र, संघर्षाची वेळ आल्यावर हे नेते मैदानातून पळ काढतात. करोनाच्या काळात आपण घरात लपून बसणारे नेतेही पाहिले असतील. मात्र, प्रवीण दरेकर हा आव्हानांना थेट भिडणारा नेता आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दरेकरांची पाठराखण केली आहे.
ते गुरुवारी प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या वर्षभराचा लेखाजोखा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांची मुक्तकंठाने तारीफ केली. प्रवीण दरेकर यांनी आव्हानात्मक आणि संक्रमणाच्या काळात विरोधी पक्षनेतेपदाची धुरा हातात घेतली. माणसाचा कस हा आव्हानावेळीच लागतो. संघर्षाच्या काळात व्यक्ती कशी वागते, यावर त्याचं नेतृत्त्व जोखलं जातं, असे फडणवीस यांनी म्हटले.
मात्र, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याच्या ओघात केलेल्या काही वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. भाषणं तर अनेक लोक करतात, अनेकांना ती कला चांगली अवगतही आहे. पण मैदानात संघर्षाची वेळ आल्यानंतर घरात लपून बसणारे, मैदानातून पळ काढणारे अनेक नेते आपण पाहिले आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या नेत्यांच्या दिशेने होता, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांना टोला?
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला असताना आणि लोकं मृत्यमुखी पडत असताना काही लोकं वेगवेगळे पॅटर्न सांगून आपल्या पाठी थोपटून घेत होते. पण समाजात जात नव्हते, समाजाचं दु:ख समजून घेत नव्हते. त्यावेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळत नव्हती, लोक रस्त्यावर मरुन पडत होते. अशा काळात भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन काम केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.





