नवी दिल्ली – दिल्ली अल्पवयीन तरूणीच्या हत्येमुळे पुन्हा एकदा हादरली आहे. दिल्लीत एका 16 वर्षीय मुलीची तिच्या प्रियकराकडून तब्बल 40 वार करून हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेने शाहबाद डेअरी परिसरात एकच खळबळ उडाली.
ही घटना रविवारी (ता. 28 मे) रात्री घडली. मनाचा थरकाप उडवणारी ही घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पण पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच आरोपी तरूणाला बुलंदशहर येथून अटक केली आहे. साहिल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर साक्षी असे मृत तरूणीचे नाव असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत तरूणी ही शाहबाद डेअरी परिसरातील जे. जे. कॉलनीमध्ये वास्तव्यास होती. आरोपी साहिल आणि मृत तरूणी हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पण शनिवारी (ता. 27 मे) या दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाले. त्यानंतर तरूणी रविवारी मित्राच्या वाढदिवसाकरिता जात असत, आरोपी साहिलने तिला रस्त्यात अडवले. यानंतर तिने तिच्यावर 40 वार करत तिची हत्या केली.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी फक्त तरूणीवर वार करूनच थांबला नाही तर त्याने तिला दगडाने देखील ठेचले. सदर घटना घडत असताना या ठिकाणी अनेक लोक देखील उपस्थित होते, पण त्यातील कोणीही या तरूणाला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून ती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. तर या घटनेची दिल्ली महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली असून महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती महिवाल यांनी सांगितले की, अशी घटना यापूर्वी पाहिली नाही. पुन्हा अशाप्रकारचे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही, असे बदल पोलीस व्यवस्थेत करण्याची आवश्यकता आहे.