Cockroach Janata Party: सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’बाबत आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाइन्स अँड ट्रेडमार्क्सच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी या नावाच्या नोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे इंटरनेटवरील मीम्स आणि राजकीय चर्चांनंतर या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. सध्या दोन्ही अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून, संबंधित नावावर अंतिम अधिकार कुणाला मिळणार याबाबत निर्णय पुढील तपासणीनंतरच होणार आहे. अद्याप कोणत्याही अर्जाला मंजुरी देण्यात आलेली नाही. ‘एक्स’वरील खाते बंद; नव्या नावाने पुनरागमन – दरम्यान, ‘Cockroach Janata Party’चे ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील खाते काही तासांपूर्वी बंद करण्यात आले होते. त्यानंतर ‘Cockroach is Back’ या नावाने नवे खाते सुरू करण्यात आले. या नव्या खात्याच्या बायोमध्ये ‘Cockroaches Don’t Die’ असा संदेश देण्यात आला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे ही ऑनलाइन मोहीम थांबण्याची चिन्हे नसल्याची चर्चा रंगली आहे. अभिजीत दीपके यांचा पुढाकार – माध्यमांतील वृत्तानुसार, या मोहिमेचे संस्थापक अभिजीत दीपके असून ते पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातून शिक्षण घेतले असून पत्रकारितेची पदवी पूर्ण केली आहे. सध्या ते अमेरिकेतील Boston University येथे पब्लिक रिलेशन्सचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वक्तव्यानंतर मोहिमेची सुरुवात – काही दिवसांपूर्वी बेरोजगारीसंदर्भातील एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ही मोहीम सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. बेरोजगार युवक हे झुरळासारखे आहेत ते सोशल मीडिया किंवा माध्यमांमध्ये सक्रिय होतात आणि व्यवस्थेवर टीका करू लागतात, असे वक्तव्य त्यांनी केल्याचे वृत्त होते. या वक्तव्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया – ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोहिमेवर विविध राजकीय पक्षांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षांनी ही मोहीम बेरोजगारी आणि तरुणांतील नाराजीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनीही माध्यमांशी बोलताना, “देशातील बेरोजगार तरुण किती अस्वस्थ आहेत, हे या मोहिमेतून दिसून येते,” अशी प्रतिक्रिया दिली.