IAS Prashant Lokhande : मोठी बातमी ! प्रशांत लोखंडे सीबीएसईचे नवे अध्यक्ष; महाराष्ट्रातील अधिकाऱ्याकडे कोट्यवधी विद्यार्थ्यांची जबाबदारी
IAS Prashant Lokhande : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ला नवा अध्यक्ष मिळाला असून वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रशांत सीताराम लोखंडे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Prashant Lokhande : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ला नवा अध्यक्ष मिळाला असून वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रशांत सीताराम लोखंडे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT) यासंदर्भातील आदेश जारी केला असून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ते विद्यमान अध्यक्ष राहुल सिंह यांची जागा घेणार आहेत.
याआधी काही तासांपूर्वीच विद्यमान अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांची बदली करण्यात आली होती. बोर्डाच्या नव्या डिजिटल मूल्यांकन प्रणालीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रशांत लोखंडे हे एजीएमयूटी (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश) कॅडरचे 2001 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सीबीएसईचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी ते केंद्रीय गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांची नियुक्ती अतिरिक्त सचिव दर्जा आणि वेतनमानातच करण्यात आली आहे.
मूळचे महाराष्ट्रातील असलेले प्रशांत लोखंडे हे प्रशासकीय क्षेत्रातील अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. शिस्तबद्ध कामकाज, धोरणात्मक विषयांवरील सखोल आकलन आणि प्रभावी प्रशासन यासाठी त्यांची विशेष ख्याती आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक मंडळाच्या नेतृत्वासाठी त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे.
मोठ्या आव्हानांचा सामना –
सीबीएसईअंतर्गत देश-विदेशातील 25 हजारांहून अधिक शाळा कार्यरत असून कोट्यवधी विद्यार्थी या मंडळाशी संलग्न आहेत. त्यामुळे अध्यक्ष म्हणून लोखंडे यांच्यासमोर अनेक महत्त्वाची आव्हाने असणार आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी, नव्या अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी, बोर्ड परीक्षांची पारदर्शक व सुरळीत व्यवस्था, डिजिटल मूल्यमापन प्रक्रियेतील सुधारणा तसेच शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात समन्वय साधणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल.
अलीकडेच सीबीएसईच्या मूल्यमापन प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर बोर्डाच्या नेतृत्वात करण्यात आलेला हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. अशा परिस्थितीत सीबीएसईच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याचे आव्हान नव्या अध्यक्षांसमोर असेल.
देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेतील सर्वात प्रभावशाली संस्थांपैकी एक असलेल्या सीबीएसईचे नेतृत्व आता प्रशांत सीताराम लोखंडे यांच्याकडे आले असून त्यांच्या कार्यपद्धतीकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
ऑन-स्क्रीन मार्किंगमुळे निर्माण झाला वाद –
यंदा बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी CBSEने प्रथमच ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणाली लागू केली होती. या पद्धतीत उत्तरपत्रिका स्कॅन करून डिजिटल माध्यमातून तपासल्या जातात. सुरुवातीला ही प्रणाली अधिक पारदर्शक आणि जलद असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काही विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेल्या स्कॅन उत्तरपत्रिका त्यांच्या मूळ हस्ताक्षराशी जुळत नसल्याचा दावा केला. त्यामुळे उत्तरपत्रिकांच्या पडताळणीबाबत शंका निर्माण झाली. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली.
याशिवाय शिक्षकांच्या मानधनात झालेला विलंब, प्रणाली वारंवार बंद पडणे तसेच पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला लागणारा वाढीव वेळ याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.
OSM प्रणालीची होणार सखोल चौकशी –
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण मंत्रालयाने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. मंत्रालयाच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून ती ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणाली, संबंधित निविदा प्रक्रिया तसेच तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींची सखोल तपासणी करणार आहे.
तसेच पुनर्मूल्यांकन पोर्टलची सुरक्षा, तांत्रिक क्षमता आणि कार्यप्रणालीचाही आढावा घेतला जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा विषय केवळ तांत्रिक अडचणींपुरता मर्यादित नसून देखरेख आणि प्रक्रियात्मक पातळीवरील संभाव्य त्रुटींचाही तपास केला जाणार आहे.





