Car Tips: जाणून घ्या – हिवाळ्यात कार सुरू करताना होणारा त्रास टाळण्याचे मार्ग

Car Maintenance In Winter: काही दिवसांतच आता हिवाळा आगमण करणार आहे. पेट्रोल-डिझेल गाड्यांना हिवाळ्यात काही वेळा सुरू होण्यास त्रास होतो. बहुतेक वेळा डिझेल कार हिवाळ्यात सुरु होण्यास त्रास देतात. परंतु पेट्रोल कारमध्येदेखील हे होऊ शकते. कार सुरू करण्यात समस्या येण्याची अनेक कारणे असू शकतात आणि ती रोखणे देखील शक्य आहे. तर, अशा समस्यांमागील कारणे आणि त्यांना कसे टाळता येईल याबद्दल माहिती जाणून घेऊया..
हिवाळ्यात कार सुरू करण्यात अडचण येण्याची कारणे –
– थंडीमुळे इंजिन तेल घट्ट होते. यामुळे इंजिनच्या पिस्टनला सिलिंडरमध्ये वर-खाली करण्यासाठी अधिक ताकदीची आवश्यकता असते. यामुळे स्टार्टर मोटरवर दबाव वाढतो.
– थंडीमुळे बॅटरीची क्षमताही कमी होते. यामुळे, काही वेळा स्टार्टर मोटरला पुरेसा विद्युत प्रवाह मिळत नाही. त्यामुळे गाडी सुरू करण्यातही अडचण येते.
– थंडीमुळे इंधनाचे ज्वलन नीट होत नाही. यामुळे इंजिन सुरू होण्यास अधिक वेळ लागतो. ही समस्या पेट्रोल कारपेक्षा डिझेल कारमध्ये जास्त आढळते.
हिवाळ्यात कार सुरू करताना त्रास टाळण्याचे मार्ग –
– तुमच्या कारची बॅटरी वेळोवेळी तपासा. बॅटरीची चार्जिंग पातळी नेहमी 12.6 व्होल्टच्या वर असावी. म्हणून, हिवाळा सुरू होण्यापूर्वी, बॅटरी तपासा आणि आवश्यक असल्यास, ती बदलून घ्या.
– हिवाळ्यात उघड्यावर कार पार्क करू नका. थंडीमुळे गाडीच्या इंजिन आणि बॅटरीवर अधिक परिणाम होतो. हे टाळले पाहिजे. झाकलेल्या शेडमध्ये कार पार्क करा.
– कार सुरू होत नसल्यास, तुम्ही दुसरी कार बॅटरी किंवा कार जंक्शन वापरू शकता. याच्या मदतीने कारच्या स्टार्टर मोटरला पुरेसा विद्युत प्रवाह मिळू शकेल.
– यानंतरही गाडी सुरू झाली नाही, तर गाडीचे इंजिन गरम होईल अशी काही व्यवस्था करा आणि मगच गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करा. आता गाडी सुरू होईल अशी आशा आहे.



