पोटनिवडणुक निकाल: असं, कसं…बा! भाजप चकित…!

Updated On:

मुंबई – कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुका लक्षवेधी ठरल्या. त्यांचे निकालही जाहीर झाले. त्यावरून महाराष्ट्रातील पुढील राजकीय हवामानाचा अंदाज वर्तवणे तूर्त तरी घाईचे ठरेल. तसे असले तरी, पोटनिवडणुकांचे निकाल प्रामुख्याने भाजपला चकित करणारे आणि त्या पक्षाची चिंता वाढवणारे आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भाजपने कसबा या हक्काच्या मतदारसंघाच्या रूपाने गमावलेला बालेकिल्ला.

महाराष्ट्रात मागील वर्षाच्या मध्यात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. शिवसेनेतील बंडामुळे राज्यात सत्ताबदल झाला. महाविकास आघाडीचे (मविआ) सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्या घडामोडींनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखीच तीव्र बनला. अशात महिनाभरापूर्वी विधान परिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये निवडणुका झाल्या.

त्यांच्याकडे सत्ताधारी आणि विरोधकांच्या लोकप्रियतेची पहिली कसोटी म्हणून पाहिले गेले. त्यामध्ये विरोधी बाकांवर असणाऱ्या मविआने बाजी मारली. मविआने तीन जागा पटकावल्या. अपक्षाचा एका जागेवर विजय झाला. तर, भाजपला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्या निकालांचे विस्मरण होण्याआधीच कसबा आणि चिंचवड विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. दुसरी कसोटी म्हणून पाहिल्या गेलेल्या त्या पोटनिवडणुकांचे निकालही प्रामुख्याने भाजपसाठी हादरा ठरले आहेत.

कसब्यासारखा सुरक्षित मतदारसंघ भाजपने गमावला. तर, चिंचवडमधील त्या पक्षाचा विजयही फारसा चमकदार नाही. सहानुभूती आणि बंडखोरी हे घटक चिंचवडमधील भाजपच्या विजयात मोठा हातभार लावणारे आहेत. आधीच्या विधान परिषद निवडणुका आणि आताच्या विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे मविआच्या गोटात उत्साहाचे वातावरण संचारले आहे. त्यातून मविआचे घटक असणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरूवात केली आहे.

निवडणुकांचे निकाल परिवर्तनाची नांदी आहेत. जनता आमच्या पाठिशी आहे, अशा प्रतिक्रिया मविआच्या गोटातून आल्या आहेत. ठाकरे गटाने तर थेटपणे सत्ताधाऱ्यांना डिवचणारी प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत खरी शिवसेना समवेत असल्याने भाजपचे बालेकिल्ले सुरक्षित होते. यापुढे भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उद्धवस्त करू. डुप्लिकेट शिवसेनेचा किती प्रभाव आहे तेही निकालांमुळे पुढे आले, अशी उपरोधिक टिप्पणी ठाकरे गटाने केली. मविआला कदाचित सत्ताधाऱ्यांकडून जशास तसे शाब्दिक उत्तर दिलेही जाईल. पण, ताजे निकाल सत्ताधाऱ्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडतील, एवढे निश्‍चित.

आणखी संबंधित बातम्या

Pune: भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी; कसब्यातून हेमंत रासने पुन्हा रिंगणात

2024-10-27 08:38:47

Pune: भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी; कसब्यातून हेमंत रासने पुन्हा रिंगणात

कसबा पोटनिवडणूक : बिचुकले आणि दवे यांच्या शर्यतीत नोटाची सरशी

2023-03-02 11:01:52

कसबा पोटनिवडणूक : बिचुकले आणि दवे यांच्या शर्यतीत नोटाची सरशी

#PuneByElection : कसबा पोटनिवडणुकीसाठी 50.06 टक्के मतदान

2023-02-26 23:07:08

#PuneByElection : कसबा पोटनिवडणुकीसाठी 50.06 टक्के मतदान

कसबा पोटनिवडणुकीआधीच अभिजीत बिचुकलेंच्या अडचणीत वाढ; अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार?

2023-02-09 08:12:44

कसबा पोटनिवडणुकीआधीच अभिजीत बिचुकलेंच्या अडचणीत वाढ; अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार?

कसबा पोटनिवडणूक : काँगेसकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताचं रवींद्र धंगेकरांनी घेतली टिळक कुटुंबीयांची भेट

2023-02-06 10:30:58

कसबा पोटनिवडणूक : काँगेसकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताचं रवींद्र धंगेकरांनी घेतली टिळक कुटुंबीयांची भेट