Arun Lakhani : “सुप्रिया ताईंनी मला…”, भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्योगपती अरुण लखानींची प्रतिक्रिया
Arun Lakhani : विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर उद्योगपती अरुण लाखानी यांनी राजकारण आणि कौटुंबिक नातेसंबंध या दोन स्वतंत्र गोष्टी असल्याचे स्पष्ट केले.

Arun Lakhani : विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर उद्योगपती अरुण लाखानी यांनी राजकारण आणि कौटुंबिक नातेसंबंध या दोन स्वतंत्र गोष्टी असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचा विवाह लाखानी यांचे पुत्र सारंग यांच्याशी २० जून रोजी होणार आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना लाखानी म्हणाले की, “सुप्रिया ताईंनी मला शुभेच्छा संदेश पाठविला आहे. पवार कुटुंबाचा उल्लेख होणे स्वाभाविक आहे. ते मोठे राजकीय कुटुंब आहे आणि आमचे त्यांच्याशी नाते आहे. त्यात काहीही वेगळे किंवा अनपेक्षित नाही.”
राजकीय विचारधारा आणि कौटुंबिक नाते यामध्ये विरोधाभास वाटत नाही का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी दोन्ही गोष्टी स्वतंत्र असल्याचे सांगितले. “दोन्ही कुटुंबे आपापल्या विचारधारांशी बांधील आहेत. राजकारण आणि वैयक्तिक संबंध यांची सरमिसळ होऊ नये,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मतदारसंघाची चांगली माहिती –
निवडणुकीतील संधींबाबत बोलताना लाखानी म्हणाले की, लोकशाहीत मतदार आपल्या विकासासाठी काम करणाऱ्या आणि शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणाऱ्या उमेदवारांवर विश्वास ठेवतात. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या तीन भिन्न वैशिष्ट्यांच्या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या विस्तीर्ण मतदारसंघाची त्यांना चांगली माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
“लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या कामानिमित्त या भागात मी मोठ्या प्रमाणावर फिरलो आहे. येथील लोकांशी माझा संपर्क आहे. त्यामुळे हा परिसर माझ्यासाठी नवीन नाही. भाजपने दिलेली संधी मी जिंकून दाखवेन, असा मला विश्वास आहे,” असे लाखानी म्हणाले.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे प्रशासक म्हणूनही काम केलेल्या लाखानी यांनी सार्वजनिक निवडणूक लढविणे हा स्वतःसाठी नवा अनुभव असल्याचे नमूद केले. निवडणूक प्रचार निरोगी आणि क्रीडाभावनेने पार पडावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विजय वडेट्टीवार यांचा टोला –
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लाखानी यांच्या उमेदवारीवरून भाजपवर टीका केली. “भाजप तळागाळातील कार्यकर्त्यांपेक्षा उद्योगपतींना अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसते,” असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे सांगताना वडेट्टीवार म्हणाले, “भाजपकडे संख्याबळ असतानाही उमेदवारांची घोषणा शेवटच्या क्षणापर्यंत लांबविण्यात आली. यावरून पक्षामध्ये काहीशी अस्वस्थता असल्याचे दिसते.”
चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसने किसान सेलचे राष्ट्रीय सचिव आणि विविध राज्यांचे प्रभारी शैलेन्द्र अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील १६ विधान परिषद जागांसाठी तसेच नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एका पोटनिवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हेच मतदार म्हणून सदस्यांची निवड करणार आहेत.




