पुणे -एप्रिल 1 पासून, बॅंक ऑफ बडोदा, विजया बॅंक व देना बॅंक यांचे विलिनीकरण लागू झाले असून, यामुळे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बॅंक उदयास आली आहे.
रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विजया बॅंक व देना बॅंक यांच्या सर्व शाखा एप्रिल 1, 2019 पासून बॅंक ऑफ बडोदाच्या शाखा म्हणून काम करणार आहेत. विजया बॅंक व देना बॅंक यांच्या ठेवीदारांसह सर्व ग्राहकांना सदर तारखेपासून बॅंक ऑफ बडोदाचे ग्राहक असे समजले जाईल.
यामुळे बॅंकेची भौगोलिक व्याप्ती अधिक व्यापक होईल व त्यामध्ये 9,500 शाखा, 13400 एटीएम, 85,000 कर्मचारी 120 दशलक्षहून अधिक ग्राहकांना सेवा देतील. बिझनेस मिक्स 15 लाख कोटी रुपयांहून अधिक असेल. त्यामध्ये ठेवी व ऍडव्हान्सेस यांचे प्रमाण अनुक्रमे 8.75 लाख कोटी रुपये व 6.25 लाख कोटी रुपये असेल. पूरक शाखांमुले पश्चिमेकडील व दक्षिणेकडील राज्यांतील जाळे वाढणार आहे. बॅंकेचा गुजरातमध्ये बाजारहिस्सा 22% असेल आणि महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांत 8 ते 10 टक्के असेल.
विलीन झालेल्या बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून त्यांना बॅंकाचा आकार व व्याप्ती वाढल्याने एका मोठ्या बॅंकेकडून विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कामाच्या बाबतीतील संधी व अनुभव यामध्ये वाढ होईल.