Aviva Baig – Raihan Vadra engagement: प्रियांका गांधींची होणारी सून अवीवा बेग कोण ? मुलगा रेहानचा पार पडला साखरपुडा, गांधी-वाड्रा कुटुंबात आनंदाचे वातावरण

Aviva Baig – Raihan Vadra engagement: काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेहानने आपली अनेक वर्षांपासूनची मैत्रीण अवीवा बेग हिच्याशी साखरपुडा केला आहे. रेहानने अवीवाला लग्नासाठी मागणी घातली आणि तिने त्याचा स्वीकार केल्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा सोहळा पार पडला. गेल्या सात वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखतात.
२५ वर्षीय रायहान वाड्राने आपल्या कुटुंबाच्या राजकीय वारशापेक्षा वेगळी वाट निवडली आहे. २९ ऑगस्ट २००० रोजी जन्मलेल्या रेहानला लहानपणापासूनच कला आणि फोटोग्राफीची आवड आहे. त्याचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीत आणि त्यानंतर देहरादूनच्या प्रसिद्ध दून स्कूलमध्ये झाले. विशेष म्हणजे त्याचे आजोबा राजीव गांधी आणि मामा राहुल गांधी यांनीही याच शाळेत शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने लंडनच्या ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’ (SOAS) मधून उच्च शिक्षण पूर्ण केले. रेहान आज एक यशस्वी व्हिज्युअल आणि इन्स्टॉलेशन आर्टिस्ट म्हणून ओळखला जातो. त्याने आयोजित केलेल्या ‘डार्क परसेप्शन’ आणि ‘द इंडिया स्टोरी’ यांसारख्या प्रदर्शनांचे मोठे कौतुक झाले आहे.
कोण आहे अवीवा बेग?
प्रियांका गांधींची होणारी सून अवीवा बेग ही देखील एक प्रतिभावान कलाकार आणि फोटोग्राफर आहे. अवीवा दिल्लीची रहिवासी असून तिने ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवी संपादन केली आहे. ती ‘एटेलियर ११’ (Atelier 11) या फोटोग्राफी स्टुडिओ आणि प्रोडक्शन कंपनीची सह-संस्थापक आहे. अवीवाचा अनुभव मोठा असून तिने अनेक नामांकित ब्रँड्स आणि मासिकांसोबत काम केले आहे. इंडिया आर्ट फेअर आणि मेथड गॅलरी यांसारख्या मोठ्या व्यासपीठांवर तिने आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन केले आहे.
रेहान आणि अवीवा हे दोघेही फोटोग्राफी क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांची आवड मिळतीजुळती आहे. रेहानचे आजोबा राजीव गांधी यांनाही फोटोग्राफीचा छंद होता आणि रेहान अनेकदा त्यांच्या कामाचा अभ्यास करतो. लवकरच या शाही विवाहाची तारीख निश्चित होण्याची शक्यता असून, सध्या गांधी-वाड्रा कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.





