#CWC2019 : कांगारूंची मस्ती जिरली!

पुणे  – विश्‍वचषकावर पाच वेळा नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणून त्यांची मस्ती जिरविण्यात इंग्लंडने यश मिळविले आहे. आपण जगज्जेते असल्यामुळे कसेही वागले तरी चालते अशा भ्रमात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू वावरत होते. साखळी गटात दोन पराभव झाल्यानंतरही त्यांची शेखी कमी झाली नव्हती. इंग्लंडने त्यांची सपशेल धूळदाण उडवित चांगलाच दणका दिला आहे.

ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ऍशेस मालिका भारत व पाकिस्तान यांच्यातील लढतीइतकीच चुरशीने खेळली जाते. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया व इंग्लंड लढतीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधार ऍरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पहिले तीन गडी अवघ्या 14 धावांमध्ये तंबूत धाडले, तेव्हाच ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्‍चित झाला होता.

कारण त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा अभावच होता. त्यातच उस्मान ख्वाजा हा अनुभवी फलंदाज जायबंदी झाल्यामुळे त्यांच्यापुढे मधल्या फळीची समस्या अधिकच गंभीर झाली होती. साखळी गटात भारताने कांगारूंना पराभवाचा धक्‍का दिला होता. उपांत्यफेरी निश्‍चित झाल्यानंतर झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनेही त्यांना पराभूत करीत आणखी एक धक्‍का दिला होता. या दोन पराभवापासून ते बोध घेतील अशी अपेक्षा होती.

तथापि आपण पाच वेळा विजेतेपद मिळविले आहे. आपल्याला बाद फेरीत कोणीही हरवू शकत नाही, तसेच उपांत्य फेरीत इंग्लंडचा संघ असला तरी आपण त्यांना साखळी लढतीत सहज हरविले आहे या भ्रमातच त्यांचे खेळाडू गाफील राहिले होते. बाद फेरीतील चुका खूपच महागात पडतात, या चुकांना क्षमा नसते हे त्यांनी लक्षात घेतले नाही. अनेक वेळा त्यांचे खेळाडू सामना गांभीर्याने घेतच नाहीत त्याचाच फटका त्यांना भारत व आफ्रिका यांच्याविरुद्धच्या सामन्यांचे वेळी बसला होता.

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू व प्रशिक्षक स्टाफपैकी वरिष्ठ सदस्य स्वत:चे दोष झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण करण्यावरच ते जास्त भर देतात. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या उणिवांबद्दल अधिकाधिक टीका करण्यावर त्यांचे वरिष्ठ खेळाडू लक्ष देत असतात. तसेच त्यांचे माजी खेळाडूही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देतात. एखाद्या जुन्या पुस्तकातील लेखाचा संदर्भ देत सतत प्रतिस्पर्धी खेळाडूंबाबत उखाळ्यापाखाळ्या करण्यात त्यांच्या माजी खेळाडूंना स्वारस्य वाटत असते.

वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ हे चेंडू कुरतडण्याच्या गुन्ह्यात दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर एक वर्षासाठी सामने खेळण्यास मनाई करण्यात आली होती. विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी त्यांच्यावरील बंदीचा कालावधी संपल्यामुळे या दोन्ही खेळाडूंचा विश्‍वचषक संघात समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या दोघांनीही या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रत्यय घडविला. जरी मैदानावरील कामगिरीद्वारे त्यांनी आपण केलेल्या गुन्ह्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या जीवनातील चेंडू कुरतडण्याचा कलंक पुसला जाणे अशक्‍य आहे. या घटनेमुळे गतवर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्र ढवळून निघाले होते. तरीही

विविध सामन्यांचे वेळी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचे मनोधैर्य खचविण्यासाठीच ऑस्ट्रेलियाकडून प्रयत्न झाला आहे.
विश्‍वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचे आत्मपरीक्षण करण्याचीच त्यांच्यावर वेळ आली आहे. आपल्या संघाचा चेहरामोहरा बदलण्याचीच त्यांना आवश्‍यकता आहे. आगामी ऍशेस मालिका ही त्यांच्यासाठी चांगली संधी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.