Anil Deshmukh Bail : वकील अनिकेत निकम म्हणाले, त्यांच्या तब्येतीच्या नोंदी न्यायालयासमोर सादर केल्यात

मुंबई – केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तथापि, या निर्णयाच्या विरोधात सीबीआयला सुप्रीम कोर्टात अपील दाखल करायचे असेल तर त्यासाठी हायकोर्टाने अनुमती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या जामिनाच्या निर्णयाला दहा दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यांना त्यांचा पासपोर्ट कोर्टात जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
न्यायालयाच्या निर्णयाबाबत देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी सांगितले की, त्यांची तब्येत बिघडल्याच्या कारणास्तव आम्ही जामिनासाठी युक्तिवाद केला आणि त्यांच्या तब्येतीच्या नोंदीही न्यायालयासमोर सादर केल्या. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे; परंतु या निर्णयाला दहा दिवसांची स्थगिती देण्यात आल्याने देशमुख यांना अजूनही कारागृहातच राहावे लागेल.

