Alandi LPG Gas Booking : आळंदीत भारत गॅस बुकिंग नंबर बंद; फोन पेद्वारेच बुकिंग, १० दिवस वेटिंग
Alandi LPG Gas Booking : पैसे भरल्यानंतरही सिलिंडर मिळण्यासाठी तब्बल दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे आळंदी भोसले भारत गॅस वितरण ऑफिस मधून सांगण्यात आले आहे. सध्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९१६ रुपये इतकी आहे.

Alandi LPG Gas Booking : आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील घरगुती एलपीजी भारत गॅस वितरण केंद्राचा दूरध्वनी बुकिंग क्रमांक बंद करण्यात आला असून आता केवळ फोन पेद्वारेच सिलिंडर बुकिंग स्वीकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व स्मार्टफोनची सुविधा नसलेल्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
फोन पे बुकिंग अन् दहा दिवसांची प्रतीक्षा- Alandi LPG Gas Booking

LPG Cylinder Booking
सध्या ग्राहकांना आधी फोन पेद्वारे बुकिंग करून संपूर्ण रक्कम अदा करावी लागत आहे. पैसे भरल्यानंतरही सिलिंडर मिळण्यासाठी तब्बल दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे आळंदी भोसले भारत गॅस वितरण ऑफिस मधून सांगण्यात आले आहे. सध्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९१६ रुपये इतकी आहे.
७ मार्चपासून ६० रुपये दरवाढ- Alandi LPG Gas Booking
इंडियन ऑयल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तेल विपणन कंपन्यांनी ७ मार्च २०२६ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमतीत ६० रुपयांनी वाढ केली. व्यावसायिक सिलिंडरच्या (१९ किलो) किमतीत तब्बल ११५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरवाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक भार वाढला आहे.
दरवाढीची कारणे-
आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन तसेच वाहतूक व वितरण खर्चात झालेली वाढ ही दरवाढीची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशांतर्गत दरावरही दबाव निर्माण झाला आहे.
नागरिकांमध्ये नाराजी –
एकीकडे सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे ऑनलाइन पेमेंट प्रणालीशी परिचित नसलेल्या ग्रामीण व ज्येष्ठ नागरिकांना फोन पे सक्तीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





