मनोज जरांगेंवर आरोप करणं बारस्कर महाराजांना पडलं महागात; ‘प्रहार जनशक्ती’नं दिला दणका!

Ajay maharaj baraskar – मनोज जरांगे हा अत्यंत हेकेखोर माणूस आहे. तो कोणत्याही शब्दावर अडून राहत होता. आमचा समाज खूप भोळा आहे. मात्र, मनोज जरांगे हे कायम पलटी मारतात आणि रोज खोटे बोलतात, असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर हे आरोप केले.
बारस्कर हे मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीतील सदस्य आहेत. तसेच ते प्रहार जनशक्ती वारकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी जरांगे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे प्रहार जनशक्ती पक्षाकडून अधिकृत पक्षादेश जारी केला आहे. अजय महाराज बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेतून बडतर्फ करण्यात येत असल्याचे पक्षादेशात म्हंटले आहे.
प्रहार जनशक्तीच्या पक्षादेशात काय लिहिलेय ?
सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचित करण्यात येते की, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचा आदेश आहे की, पक्षामध्ये कोणीही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण किंवा नेत्यांबद्दल कोणतीही भूमीका मांडू नये, असे केल्यास त्या व्यक्तीचा प्रहार जनशक्ती पक्षाशी काहीही संबंध राहणार नाही.
पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हेच स्वत: मांडतील. इतर कोणीही अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय आपली भूमिका मांडू नये. आज दि. 21/02/2024 रोजी अजय महाराज बारस्कर यांनी जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्यावषयी मांडळी त्या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही किंवा काहीही संबंध नाही. तरी अजय बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेतून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा पक्षाशी आजपासून काहीही संबंध राहणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे पत्रात म्हंटले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रावर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू उर्फ महेंद्र जवंजाळ यांची सही आहे.
काय म्हणाले होते अजय महाराज बारस्कर –
मनोज जरांगे हा अत्यंत हेकेखोर माणूस आहे. तो कोणत्याही शब्दावर अडून राहत होता. आमचा समाज खूप भोळा आहे. मात्र, मनोज जरांगे हे कायम पलटी मारतात आणि रोज खोटे बोलतात. मी पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी असे आरोप करत नाही. मी कीर्तनाचे पैसे घेत नाही. मात्र, मनोज जरांगे यांच्या प्रत्येक कृतीचा मी साक्षीदार आहे. माझ्या मनात अनेक दिवसापासून खदखद होती. ती आज मी व्यक्त केली. यामुळे मला वारंवार फोन येत आहे, गोळ्या घालून मारून टाकू, अशा धमक्या दिल्या जात आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, ते मी सहन करणार नाही, असे देखील बारस्कर म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्त अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतली. 30 डिसेंबरला ही गुप्त मीटिंग झाली. त्याचा मी साक्षीदार आहे. तसेच लोणावळा, वाशी येथे देखील मराठा समाजाला डावलून काही बैठका झाल्या. मात्र, अशा गुप्त बैठकांना माझा आक्षेप होता. या गुप्त बैठकांचे अनेक पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा देखील बारसकर यांनी केला. मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देतोय. मधल्या काळात आंतरवाली सराटीत जी घटना घडली, त्यानंतर मी आंदोलनाच्या या लढ्यात पुन्हा एकदा सहभागी झालो. तेव्हापासून मी जरांगे यांच्यासोबत आंदोलना सहभागी झालो होतो, असे बारस्कर म्हणाले.
बारस्कर यांच्या आरोपांवर मनोज जरांगेची प्रतिक्रिया –
“बारस्कर यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे म्हणाले, जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवू नका, हे पाप तुम्हाला फेडावे लागेल. महाराजांची बदनामी होईल, समाजाचे नुकसान करू नका. हा सरकारचा ट्रॅप आहे. अजय बारसकर यांच्यासोबत आणखी 10 ते 15 माणसं आहेत, जे मला बदनाम करण्याचा विचार करत आहेत. यामागे पूर्णपणे सरकारचे षडयंत्र आहे. बारसकर यांना काही तरी मिळवायचे आहे, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मी असल्या चिल्लर महाराजांना मानत नाही.”
24 फेब्रुवारीपासून गावोगावी रास्ता रोको –
मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मंगळवारी घेतला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजुरीही मिळाली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आरक्षण लागू होणार आहे. न्या. शुक्रे आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाज शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल स्वीकारत हे आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाच्या मंजुरीनंतर गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना हे स्वतंत्र प्रवर्गातील आरक्षण मान्य नसून ओबीसींमधूनच आरक्षण मिळविण्यावर ते ठाम आहेत.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. बुधवारी आपल्या आंदोलनाची पुढील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. 24 तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी 10.30 ते दुपारी 1 सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत 2 सत्रांत रास्ता रोको होईल. त्यानंतर 3 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल. हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळविण्यावर ते ठाम आहेत.
मनोज जरांगे यांनी सरकारकडे सगेसोयरे अधिसूचनेच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टीमेटम दिला. जरांगे यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक पारित करणाऱ्या शिंदे सरकारपुढील तिढा अधिकच वाढला आहे.





