Actress Sai Tamhankar : “नवोदित दिग्दर्शकांसोबत काम करणं नेहमीच समृद्ध करणारं”; अभिनेत्री सई ताम्हणकरचा अनुभव
Actress Sai Tamhankar : क्रॉसओव्हर क्वीन म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकरने आजवर अनेक दर्जेदार आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. आता ती लवकरच ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटात नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Actress Sai Tamhankar : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नवोदित दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना अशा प्रकल्पांमध्ये काम करणे नेहमीच विशेष आणि समृद्ध करणारे असल्याचे सांगितले.
क्रॉसओव्हर क्वीन म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकरने आजवर अनेक दर्जेदार आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. आता ती लवकरच ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटात नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केले आहे.
सईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. ‘मटका किंग’मध्ये नागराज मंजुळे, ‘डब्बा कार्टेल’मध्ये हितेश भाटिया, ‘अग्नी’मध्ये राहुल ढोलकिया, ‘ग्राउंड झिरो’मध्ये तेजस प्रभा विजय देवोस्कर तसेच ‘मिमी’मध्ये लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत तिने काम केले आहे. आता ‘तुंबाडची मंजुळा’च्या निमित्ताने ती पुन्हा एका नव्या दिग्दर्शकासोबत काम करत आहे.
याबाबत सई म्हणाली, “नवीन व्यक्तीसोबत आणि त्यांच्या पहिल्या प्रकल्पासाठी काम करणे नेहमीच खास असते. त्यामुळे मला माझ्या सुरुवातीच्या काळातील दिवसांची आठवण होते. त्या वेळी अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता. आज मी जर तीच भावना एखाद्या नव्या दिग्दर्शकापर्यंत किंवा कलाकारापर्यंत पोहोचवू शकत असेन, तर ते खरोखरच अर्थपूर्ण वाटते.”
ती पुढे म्हणाली, “वेगवेगळ्या कार्यपद्धती असलेल्या दिग्दर्शकांसोबत आणि नव्या वातावरणात काम करायला मला आवडते. एखाद्याच्या पहिल्या आणि महत्त्वाच्या प्रकल्पाचा भाग होणे ही आनंददायी बाब असते. नव्या प्रतिभेला आणि नव्या विचारांना पाठिंबा देण्यात वेगळेच समाधान मिळते.”
सई ताम्हणकरच्या अभिनयातील सातत्य आणि भूमिका निवडीची वैशिष्ट्यपूर्ण शैली नेहमीच प्रेक्षक व समीक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आगामी काळातही ती अनेक दर्जेदार आणि आशयघन प्रकल्पांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळत आहे.

