मुंबई – दिशा सालियन आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठली असताना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. आदित्य यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केल्याचे राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राणेंवर हल्लाबोल केला. “माझे काम त्यांना उत्तर देणे नाही. पक्ष सोडल्यापासून ते आमच्यावर टीका करतात, त्याचाच त्यांना पगार मिळतो,” असा घणाघाती टोला आदित्य यांनी लगावला.
दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत –
सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी, मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी व्हावी म्हणून बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेत आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध FIR नोंदवून तपास CBI कडे सोपवण्याची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना दोनदा फोन केल्याचा दावा केला होता, ज्याला नारायण राणेंनी आजच्या पत्रकार परिषदेत दुजोरा दिला.
आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर –
“राणेंना बोलायचे असेल तर बोलू द्या. त्यांना पक्ष सोडून किती वर्षे झाली, पण आम्ही त्यांच्या मनातून उतरत नाही. त्यांचे कामच आमच्यावर खोटे आरोप करणे आहे, त्यातूनच त्यांचा पगार निघतो. कचऱ्याकडे आपण लक्ष देत नाही,” असे सणसणीत प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. राणेंच्या टीकेवर थेट उत्तर देण्याऐवजी त्यांनी ही टीका दुर्लक्ष करण्याचा पवित्रा घेतला.
रस्ते घोटाळ्यावरूनही हल्लाबोल-
आदित्य यांनी मुंबईतील रस्ते घोटाळ्याचा मुद्दाही उपस्थित केला. “१५ जानेवारी २०२४ रोजी मी पत्रकार परिषदेत हा घोटाळा उघड केला होता. आता सर्व पक्षांच्या आमदारांनी याची चौकशी मागितली आहे. भाजप आमदारांसह आम्ही EOW चौकशीची मागणी केली आहे. २०२३ आणि २०२४ मधील निविदा ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळात आल्या, ते घटनाबाह्य आणि गद्दार मुख्यमंत्री होते. त्यांच्या देखरेखीखाली हे घोटाळे झाले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
“महत्त्वाचे मुद्दे लपवण्यासाठी वाद”-
“अबू आझमी, औरंगजेब किंवा माझ्यावरचे आरोप हे वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर, भगतसिंह कोश्यारी यांसारखे मुद्दे लपवण्यासाठीच आहेत. सरकार अपयशी ठरते तेव्हा अकार्यक्षम मंत्र्यांसह वाद निर्माण केले जातात, जेणेकरून महत्त्वाचे विषय दडून राहतील,” अशी टीका आदित्य यांनी केली. “शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, सीबीएसईचा प्रश्न गंभीर बनलाय. सरकार चालवता येत नसेल तर लक्ष विचलित करण्यासाठी असे विषय काढले जातात,” असा घणाघातही त्यांनी केला.