शिक्रापूर : शिक्रापूर येथील वेळ नदीकाठी अज्ञात व्यक्तीने नवजात बालक सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र शिक्रापूर पोलिस, स्थानिक पत्रकार आणि वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे या बालकाला नवजीवन मिळाले. शिक्रापूर येथील वेळ नदीकाठी सुरेश करंजे हे पूजेसाठी गेले असता त्यांना नदीच्या कडेला एक बेवारस नवजात बालक आढळून आले. त्यांनी याबाबतची माहिती सचिन करंजे यांना दिली. त्यानंतर सचिन करंजे यांनी पत्रकार व सर्पमित्र शेरखान शेख यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच शेरखान शेख यांनी तात्काळ शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीप रतन गायकवाड यांना माहिती दिली. त्यानंतर मीनाक्षी करंजे यांच्या मदतीने बालकाला त्वरित शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक निरीक्षक राहुल देशमुख, हवालदार उद्धव भालेराव, आत्माराम तळोले, हवालदार उज्वला गायकवाड व किरण निकम यांनी रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम, डॉ. पराग कानडे, डॉ. मान्या मिश्रा तसेच प्रिया जाधव-ढगे, वैभवी शेळके, सारिका वाळकोळी, मांडवी मिंदाणे, कांचन गुल्हाणे, आरोग्य सेविका कल्पना ढोकले आणि सोनल मोरे यांनी बालकावर उपचार केले. यानंतर शिक्रापूर पोलिसांनी बालकल्याण समितीच्या माध्यमातून बालकाला पुण्यातील भारतीय समाज सेवा संस्थेत दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलीस वाहन सजवून बालकाला पुण्यात रवाना शिक्रापूर पोलिसांनी बालकाला पुण्यातील संस्थेत दाखल करण्यासाठी नेताना पोलिसांचे वाहन सजवले होते. तसेच बालकासाठी नवीन कपडे व आवश्यक वस्तूही देण्यात आल्या. या घटनेतून खाकीतील माणुसकीचे दर्शन घडले. शिक्रापूर येथे सापडलेले नवजात बालक पुरुष जातीचे असून पूर्णपणे सुदृढ आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला पोलिसांच्या मदतीने पुण्यातील संस्थेत दाखल करण्यात आले. -डॉ. शहाजी कदम, वैद्यकीय अधिकारी हेही वाचा : Pune District : मोटेवाडी येथील पाझर तलाव कोरडा; चासकमान पाण्याच्या नियोजनाअभावी शेतकरी हवालदिल