Newasa : महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार सुखदेव फुलारी यांना जाहीर
Newasa :

Newasa : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक तथा सीनियर डिस्टिलरी केमिस्ट सुखदेव एकनाथ फुलारी यांची महाराष्ट्र शासनाच्या २०२४ च्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत उद्योग क्षेत्रात कार्यरत असताना उत्पादन क्षेत्रासोबतच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य तसेच इतर क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कामगारांचा दरवर्षी विश्वकर्मा गुणवंत कामगार व कामगार भूषण पुरस्काराने गौरव केला जातो. प्राप्त प्रस्तावांची शासनस्तरावर छाननी करून आणि मुंबई येथे तोंडी मुलाखतीनंतर अंतिम निवड केली जाते.
मंगळवारी (दि. १६ जून) महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाने २०२४ सालच्या पुरस्कारार्थींची यादी जाहीर केली. यामध्ये एका कामगार भूषण पुरस्कारासह ५१ विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारार्थींचा समावेश आहे.
सुखदेव फुलारी हे १९९३ पासून लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागात केमिस्ट म्हणून कार्यरत आहेत. उत्पादन क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, रक्तदान आदी विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक आढळगड देसाई देशमुख, संचालक काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रवींद्र मोटे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार, सचिव संभाजीराव माळवदे, उपाध्यक्ष संजय राऊत, खजिनदार आप्पासाहेब शिंदे, अण्णासाहेब गर्जे तसेच संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.





