Newasa: सोन्याचे मंगळसूत्र ओरबडून पळ काढणाऱ्या दोन सराईत चोरट्यांपैकी एकाचा तारेच्या कुंपणात अडकून आणि धापा लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे रांजणगाव (देवी) शिवारात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमकी घटना काय? रांजणगाव-भानसहिवरा रस्त्यावरील चौधरी वस्तीवर शुक्रवारी (दि. १७) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. येथील रहिवासी मनिषा विष्णू चौधरी यांच्या गळ्यातील अंदाजे ७ ग्रॅम सोन्याचे मनीमंगळसूत्र एका चोरट्याने ओरबडले. मंगळसूत्र ओरबडताच मनिषा चौधरी यांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने वस्तीवरील नागरिक जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांच्या दिशेने धाव घेतली. तारेच्या कुंपणात अडकला अन… पकडले जाण्याच्या भीतीने दोन्ही चोरट्यांनी अंधारात धूम ठोकली. मात्र, पळत असताना रामदास मदिना काळे (वय ६४) हा चोरटा वाकचौरे वस्तीजवळील नवीन पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या तारेच्या कुंपणात अडकला. धावपळ आणि धापा लागल्यामुळे तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचा दुसरा साथीदार मात्र मुद्देमालासह पसार होण्यात यशस्वी झाला. पोलीस तपासाची सद्यस्थिती – घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात रंगली असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.