Newasa: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकार महाराजांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी नेवासा तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. गुरुवारी (दि. १६ एप्रिल) पत्रकार परिषद व सोशल मीडियाद्वारे राज्यातील २० हून अधिक महाराजांना “घुसखोर” असे संबोधल्याचा आरोप लवांडेंवर करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत कीर्तनकार महाराजांचा अपमान झाल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी तहसील प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने स्वतःहून गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा भविष्यात आंदोलन, मोर्चे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील उपस्थित होते. त्यांनीही कीर्तनकारांविषयीच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. सकल हिंदू समाज, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, श्री रामराज्य उत्सव समिती, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान, नेवासा तालुका वारकरी संप्रदाय देवगड भक्त मंडळ यांच्या वतीने ही निवेदने देण्यात आली. नेमकं प्रकरण काय ? वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाली आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत म्हंटले होते. याविधानानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. भाजप आणि हिंदुत्ववांद्याकडून पवारांवर टीका केली जात आहे. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात घुसखोर असल्याचे म्हणत २० जणांची नावे जाहीर केली आहेत. त्यावरून नवा वाद उभा राहू लागला आहे. वारकरी संप्रदायातून हिंदुतत्वादी विचार मांडणाऱ्या वीस लोकांची नावे विकास लवांडे यांनी जाहीर केली. ते म्हणाले, आमची लढाई राजकीय नसून ही सांस्कृतिक व वैचारिक संघर्ष आहे. आम्ही जी नावे जाहीर करणार आहोत, त्यांच्याशी आमचा वैयक्तिक कोणताही वाद, शत्रुत्व नाही. हे लोक दररोज नारदाच्या गादीवरून परधर्माचा द्वेष करणे, भेदनीती सांगणे, लोकांचा बुद्धीभेद करणे, रामकृष्ण हरी हा मंत्र पुसून जय श्रीराम हा नवीन मंत्र आणणे आणि वारकरी संप्रदायचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न या लोकांकडून केला जात आहे, असा आरोपही लवांडे यांनी केला होता. ते म्हणाले, अयोध्येच्या राम मंदिाराचे ट्रस्टी आहेत, ते गोविंद देवगिरी महाराज ज्यांचे मूळ नाव हे किशोर व्यास असे आहे. मध्यंतरी त्यांनी ज्ञानोबा-तुकोबांचे ग्रंथ नाहीत, असे वाद्ग्रस्त विधान केले होते. वारकरी संप्रदायाच्या टीका टिपण्णीनंतर त्यांनी माफी मागितली होती. दरम्यान, विकास लवांडे यांच्या या वक्तव्यांनंतर आणि त्यांनी जाहीर केलेल्या नावांवरून मोठा वाद निर्माण झाला असून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या कार्यक्त्यांनी केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वारकरी संप्रदायातील प्रतिगामी विचारसरणीचे घुसखोर म्हणून जाहीर करण्यात आलेली नावे पुढीलप्रमाणे… १) गोविंद देवगिरी महाराज २) चारूदत्त आफळे (पुणे) ३) बंडातात्या कराडकर ४) प्रकाश जवंजाळ (बुलडाणा) ५) तुषार भोसले (भाजप वारकरी आघाडीचे प्रमुख) ६) अक्षय भोसले (शिंदेसेनेच्या वारकरी आघाडीचे) ७) संग्राम भंडारे ८) योगी निरंजन (आळंदी देवस्थानचे विश्वस्त) ९) एकनाथ सदगीर १०) ज्ञानेश्वर जळकीकर ११) संजय पाचपोर १२) भास्कर गिरी महाराज देवगड १३) संजयनाना धोंडगे १४) राणा वास्कर १५) चंद्रशेखर देगलूरकर (पंढरपूर) १६) उदबोध पैठणकर १७) श्याम राठोड (सध्या नाव बदलून वागणारे) १८) किशोर शिवणीकर १९) रामगिरी महाराज २०) निरंजन कोठीकर