Newasa : थकीत ईपीएफ निधीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा
Newasa : नेवासा ग्रामपंचायत तसेच त्यानंतर स्थापन झालेल्या नगरपंचायतीतील अनेक स्वच्छता कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) नियमितपणे कपात करण्यात आला.

Newasa : नेवासा ग्रामपंचायत तसेच त्यानंतर स्थापन झालेल्या नगरपंचायतीतील अनेक स्वच्छता कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) नियमितपणे कपात करण्यात आला.
मात्र, ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा करण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन नेवासा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, थकीत ईपीएफच्या प्रश्नासंदर्भात अनेक वेळा अर्ज, निवेदने व पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून काहींचे निधनही झाले आहे.
मात्र, त्यांच्या वारसांनादेखील हक्काची रक्कम मिळालेली नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न करणे ही अत्यंत गंभीर व अन्यायकारक बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनाची प्राप्ती झाल्यापासून आठ दिवसांच्या आत सर्व कर्मचाऱ्यांचा थकीत ईपीएफ निधी त्यांच्या खात्यावर जमा करून त्याबाबतचा लेखी अहवाल सादर करावा, अन्यथा न्याय्य हक्कांसाठी ईपीएफधारक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकडून सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही जीवितहानीस अथवा कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास नेवासा नगरपंचायत प्रशासन व संबंधित अधिकारी पूर्णपणे जबाबदार राहतील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर सतीश सरोदे, कल्पना रामचंद्र चक्रनारायण, उल्हासाबाई बहिरू चक्रनारायण, लीना यशुदास साळवे, शशिकला मनोहर चक्रनारायण, वैजयंता भोसले आणि सुनीता ताराचंद चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





