Newasa: गोमातेला संविधानिक मान्यता देत “राष्ट्रमाता” दर्जा द्यावा तसेच संपूर्ण देशात गोहत्या बंदीसाठी कडक केंद्रीय कायदा लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी नेवासा येथे सोमवारी (दि. २७) सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. “गो-सन्मान आवाहन अभियान” अंतर्गत आयोजित या मोर्चास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चाची सुरुवात ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर येथून झाली. शहरातून मार्गक्रमण करत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी तहसील आवारात झालेल्या सभेत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त देविदास महाराज म्हस्के यांनी गोमातेच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने तातडीने कायदा करावा, असे आवाहन केले. सभेत उद्धव महाराज मंडलिक, ऋषिकेश महाराज, शुभम महाराज कांडेकर, अवेराज महाराज तसेच आमदार विठ्ठलराव लंघे यांनीही विचार मांडले. मोर्चानंतर आमदार लंघे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले व भाजप नेते सचिन देसरडा यांच्या हस्ते तहसीलदार डॉ. संजय बिरादार व पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात गोरक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.