नेवासा : नेवासे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, मुरकुटे यांच्या पाठोपाठ एक माजी मंत्री लवकरच राष्ट्रवादीत सामील होणार असल्याची विश्वासार्ह माहिती सूत्रांनी दिली. मुरकुटे यांच्या प्रवेश सोहळ्यानंतर आता आणखी एक माजी मंत्री, त्यांचे दोन नातेवाईक माजी आमदार आणि त्यांच्या तालमीतील एक जाणकार माजी आमदार असे एकूण चार माजी आमदार एकत्र येणार असल्याने तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावणारे ठरणार आहेत. ही मंडळी एकत्र येऊन जिल्ह्यात आपला राजकीय दबाव गट पुन्हा मजबूत करणार असल्याचे समजत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने मुरकुटे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवली होती. तिरंगी लढतीत राज्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे दिग्गज नेते शंकरराव गडाख आणि मुरकुटे यांचा पराभव करून विठ्ठलराव लंघे-पाटील आमदार झाले होते. आता विरोधक एकत्र येऊन लंघे यांच्या विरोधात बलाढ्य आघाडी उभी करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नात्यागोत्यांच्या पक्षाची ताकद पुन्हा सिद्ध! नगर जिल्ह्यात राजकीय पक्षांपेक्षा नात्यागोत्यांचा पक्ष अधिक शक्तिशाली असल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे. नात्यागोत्याच्या राजकारणात अनेकदा पक्षांना आपली भूमिका माघारी घ्यावी लागली आहे. महायुतीतील विरोधी नेत्यांना ताळ्यावर आणण्याची ताकद या पक्ष प्रवेशसोहळ्याने वाढणार आहे.